एक लाखाच्या लाच प्रकरणी DySp अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळयात’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करु नये, यासाठी १ लाख रुपयांची लाच घेताना कर्नाटक राज्यातील विजापूर येथील पोलीस हवालदारासह खासगी व्यक्तीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. डीवायएसपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विभागीय पोलीस अधिकारी महेश्वर गौड पाटील (बागेवाडी उपविभाग, विजापूर, कर्नाटक), पोलीस हवालदार मल्लिकार्जुन शिवया पुजारी (वय ३५, रा. मनमोळ पोलीस ठाणे, गोलघुमट पोलीस वसाहत, विजापूर), खासगी व्यक्ती रियाज खासिमसाहाब कोकटनूर (वय ३४, रा. जलानगर, विजापूर)अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली असून महेश्वर गौड पाटील याचा शोध घेतला जात आहे.

याप्रकरणी सोलापूरातील एका ६५ वर्षाच्या समाजसेवकाने तक्रार दिली आहे. कर्नाटक राज्यातील विजापूर येथील कोल्हार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास डीवायएसपी महेश्वर गौड पाटील याच्याकडे आहे. त्यात तक्रारदार याला आरोपी न करता साक्षीदार करावे, यासाठी गौड पाटील याने हवालदार व खासगी व्यक्तीमार्फत प्रथम ५ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर साडेतीन लाख रुपये मागितले. शेवटी दीड लाख रुपये घ्यायचे ठरले. त्यातील पहिला हप्ता एक लाख रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.

पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अजितकुमार जाधव यांनी या तक्रारीची पडताळणी केली. त्यात त्यांनी लाच मागितल्याचे दिसून आले. त्यानंतर सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात बुधवारी रात्री साडेनऊ वाजता सापळा रचण्यात आला. हवालदार पुजारी व खासगी व्यक्ती कोकटनूर यांना तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. डीवायएसपी महेश्वर गौड पाटील याचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपअधीक्षक अजितकुमार जाधव अधिक तपास करीत आहेत.

You might also like