लाच प्रकरणी डीवायएसपी (DySp) ची न्यायालयीन कोठडीत रवानगी

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन –अन्टी करप्शनच्या सापळ्याचा संशय आल्याने रक्कम न स्विकारता तक्रारदारालाच आपल्या गाडीतून पळवून नेत तक्रारदाराचा मोबाईल व व्हॉईस रेकॉर्डर हिसकावून फेकल्याप्रकरणी फलटणचे डीवायएसपी डॉ. अभिजीत पाटील यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पाटील यांनी सादर केलेल्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी करण्यात येणार आहे.

५१ वर्षीय व्यक्तीने अन्टी करप्शनकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार खंडाळा पोलीस ठाण्यात  भा.द.वि.सं.क.४२०,३४ गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात तक्रारदार यांचा ८ लाख रुपयांचा डी.डी. त्यांना मिळवून देण्यासाठी डीवायएसपी पाटील यांनी २ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने अन्टी करप्शनकडे याची तक्रार केली. अडीच लाखांपैकी १ लाख ७५ हजार रुपये स्विकारण्याची तयारी पाटील यांनी दाखवली. त्यानंतर अन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला. मात्र पाटील यांना या सापळ्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी ती लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून स्विकारली नाही.

त्यानंतर त्यांनी तक्रारदारालच गाडीत बसवून पळवून नेले. त्यांचा मोबाईल आणि अन्टी करप्शनने दिलेला शासकीय व्हाईस रेकॉर्डर जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांनी गाडीतून ढकलुन देत त्यांचा मोबाईल फोडला. आणि शासकीय व्हाईस रेकॉर्डर फेकून दिला. तो कुठे फेकून दिला. याचा तपास पथक करत आहे. त्यानंतर रात्री त्यांना अन्टी करप्शनच्या पथकाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर गुरुवारी त्यांना न्यायालायात हजर करण्यात आले. तेव्हा दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने त्यांची रवनागी न्यायालयीन कोठडीत केली. पाटील यांनी सादर केलेल्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी करण्यात येणार असून अन्टी करप्शन शनिवारी आपलं म्हणणं न्यायालयासमोर मांडणार आहे. अशी माहिती अन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी दिली.