17 मे नंतरच्या Lockdown बद्दल CM उद्धव ठाकरे यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 17 तारखेनंतर राज्यात लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा असून प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या सूचना तसेच अपेक्षा यांचे नियोजन करून ते कळवावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी (दि.12) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. लवकरच पावसाळा येत असून पावसाळ्यात साथीचे व इतर आजार पसरतात. कोरोना संकटाशी लढताना या रोगाचाही मुकाबला करावा लागेल. त्या दृष्टीने जिल्ह्यांतील विशेषत: खासगी डॉक्टर्स नियमितरित्या आपल्या सेवा सुरु ठेवतील हे पाहावे अशी सूचना त्यांनी दिल्या आहेत.

जिल्हाजिल्ह्यांच्या सीमा उघडणार नाही
पुढच्या काळात लॉकडाऊन शिथिल करताना कोणत्याही परिस्थितीत जिल्हाजिल्ह्यांच्या सीमा मात्र सरसकट उघडण्यात येणार नाहीत याचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आता मोठ्या प्रमाणावर मजुरांचे येणे जाणे सुरु झाले आहे. त्यामुळे आपल्याला आता खऱ्या अर्थाने सावध राहून योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागेल. ज्यामुळे संसर्ग वाढणार नाही.

कंटेनमेंट झोनमध्ये कडक बंधने पाळावीत
कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील हे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिले पाहिजे. या झोन बाहेर विषाणू कोणत्याही परिस्थितीत पसरला नाही पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपण एप्रिलमध्ये संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलो आहोत. आता मे महिन्यात कोरोनाची साखळी तोडायची आहे, मात्र, येणाऱ्या पावसाळ्यात विविध रोग येतील. त्यात साथीचे रुग्ण कोणते आणि कोरोनाचे रुग्ण कोणते हे पहावे लागेल. त्यादृष्टीने यंत्रणा तयार ठेवावी.

ग्रीन झोनमध्ये अंतर्गत वाहतूक सुरु
एकीकडे आरोग्य आणीबाणी आहे आणि दुसरीकडे आर्थिक आणीबाणी निर्माण होणे ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसाय सुरु करावे लागणार आहेत. मात्र, ज्या क्षेत्रात ते सुरु होत आहेत. त्या ठिकाणी अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. ग्रीन झोन्समध्ये आपण जिल्हांतर्गत वाहतूक सुरु केली आहे. पण तिथेही कटाक्षाने काळजी घ्या, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.