काम करताना जंक फूड खाताय ? वेळीच व्हा सावध

पोलीसनामा ऑनलाइन – अनेकांना घरी अथवा ऑफिसमध्ये काम करताना जंक फूड खाण्याची सवय असते. ही सवय अतिशय घातक असून अशी सवय असल्यास वेळीच सावध होण्याची गरज आहे. या सवयीमुळे विविध प्रकारचे आजार बसल्या जागी होऊ शकतात. काम करताना जंक खाण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणा, डायबिटीस आणि हार्ट संबंधी आजार होण्याचा धोका असतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

आपला सर्वाधिक वेळ हा ऑफिसमध्ये म्हणजेच कामाच्या ठिकाणी जातो. म्हणूनच अशा ठिकाणी जर जंक फूड खाण्याची सवय असेतल तर जंक फूड खाण्याचे प्रमाणही जास्त असू शकते. चिप्स, सँडविच, बर्गर यांसारखे अनहेल्दी फूडही काहीजण खातात. या सवयीमुळे दुपारचे जेवणही घेतले जात नाही. यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. याबाबत संशोधन करण्यासाठी अभ्यासकांनी एका अमेरिकन हॉस्पिटलमधील ६०० अशा कर्मचाऱ्यांची निवड केली होती. हे कर्मचारी नियमितपणे हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधील पदार्थ खात होते. या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा अभ्यास केला असता असे आढळून आले की, जे लोक कॅन्टीनमधील जंक फूड आणि अनहेल्दी फूड खात होते, त्यांच्यात जास्त लठ्ठपणा दिसून आला.

तसेच यापैकी काही कर्मचाऱ्यांना डायबिटीस आणि हार्ट संबंधी आजार झाल्याचे दिसून आले. यावरून असे समजते की, कामाच्या ठिकाणी पौष्टीक खाण्या-पिण्याच्या सवयीचा डाएट आणि आरोग्यावर परिणाम होत असतो. तसेच हेल्दी लाइफस्टाइलसाठी आणि आजारांना दूर ठेवण्यासाठी हेल्दी डाएट गरजेचे आहे हेदखील अधोरेखित होते. दरम्यान, वर्कप्लेस वेलनेस प्रोग्रामच्या माध्यमातून लोकांच्या लाइफस्टाइलमध्ये चांगला बदल आणि सुधारणा केली जाऊ शकते. पण असे प्रोग्राम तयार करणे फार चॅलेंजिंग काम होते. आशा आहे की, आमच्या या निष्कर्षांना डोळ्यासमोर ठेवून या दिशेने काम केले जाईल, असे हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीच्या जेसिका एल मेकर्ली यांनी म्हटले आहे.