ST महामंडळाने निवृत्तीनाथांचे फाडले तिकीट, वारकर्‍यांकडून वसूल केले 71 हजार !

त्र्यंबकेश्वर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले असल्यामुळे शेकडो वर्षांची परंपरा असलेली पंढरपूरची वारी यंदा रद्द करावी लागली. माऊलींच्या पादूका या शिवशाही बसने पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या. पण, नाशिकमध्ये एसटी महामंडळाचा दरिद्रीपणा उघड झाला आहे. महामंडळाने चक्क निवृत्तीनाथ महाराजांचेच तिकीट फाडले आहे.

त्र्यंबकेश्वरहून सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे 20 वारकर्‍यांसह शिवशाही बस पंढरपूरला रवाना झाली. निवृत्तीनाथ महाराजांची पालखी घेऊन ही बस पंढरपुरात दाखल झाली. मात्रा, 20 वारकर्‍यांसाठी एसटी महामंडळाच्या शिवशाही बसने तब्बल 71 हजार रुपये आकारले. फक्त 48 तासांच्या या प्रवासासाठी ही रक्कम आकारण्यात आली आहे. त्यामुळे वारकर्‍यांनी वर्गणी गोळा करून 71 हजार महामंडळाकडे भरले. त्यानंतरच शिवशाही बसने वारकर्‍यांना पंढरपूरला पोहोचता आले.

त्र्यंबकेश्वरमधून दरवर्षी नित्याप्रमाणे 50 ते 60 हजार वारकरी पायी दिंडीतून पंढरपूरला जात असतात. या काळात त्यांना कोणताही खर्च लागत नाही. परंतु, यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे वारकर्‍यांना अटीशर्थींसह पंढरपूरला पायी न जाता शिवशाही बसने पोहोचावे लागले. पण, त्यासाठीही मंडळाकडून 71 हजार खर्च घेतला आहे.