मुक्ताईनगर : भाजप कार्यालय उघडण्यासाठी देखील कुणी कार्यकर्ता मिळाला नाही !

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर मुक्ताईनगर मध्ये भाजपला उतरती कळा लागणार असल्याचा दावा करण्यात येत होता. अशात मुक्ताईनगर येथील भाजप कार्यालयाला लागलेल्या कुलुपावरून तालुक्यात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या कार्यालयात सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी असायची. आज मात्र हे कार्यालय सुने सुने दिसत आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुलगी रोहणी यांच्यासह अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हेही उपस्थित होते. मुंबईतील राष्ट्रवादी प्रवेश कार्यालयात शुक्रवारी (दि 23 ऑक्टोबर रोजी) हा प्रवेश सोहळा पार पडला.

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मुक्ताईनगरमधील भाजपचं काय होईल याबाबत चर्चा रंगताना दिसत आहे. मुक्ताईनगरमध्ये भाजपचं अस्तित्व कमी झाल्याचं मोठं उदाहरण पाहायला मिळत आहे. रोज सकाळपासून वर्दळ असलेल्या मुक्ताईनगरमधील भाजप कार्यालयाला लागलेलं कुलूप सारं काही सांगत आहे.

कार्यालयात कुणी आलंच नाही
खडसेंना मानणारा वर्ग मुक्ताईनगरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. भाजपनं खडसे यांच्यावर आरोप केला असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. म्हणूनच खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही भाजपला राम राम ठोकला. त्यामुळं मुक्ताईनगर शहरात भाजप कार्यलाय उघडण्यासाठीही कुणी भाजपचा कार्यकर्ता उरला नसल्याचं चित्र आहे.