मतदान झाल्यानंतर ‘या’ भाजप अध्यक्षांवर ‘प्रचारबंदी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमधील प्रचारादरम्यान अपमानास्पद शब्दाचा वापर केल्याबद्दल निवडणुक आयोगाने गुजरात भाजपचे अध्यक्ष जीतू वाघाणी यांच्यावर ७२ तासाची प्रचारबंदी घातली आहे. मात्र, गुजरातमधील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदान २३ एप्रिल रोजीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे मतदानानंतर तब्बल एक आठवड्याने घातलेल्या या बंदीला काहीही अर्थ राहिलेला नाही़ तरीही निवडणुक आयोगाने ही प्रचारबंदी २ मे पासून लागू होणार असल्याचे आपल्या आदेशात म्हटले आहे.

जीतू वाघाणी यांनी सूरतमध्ये एका भाषणादरम्यान काँग्रेसविषयी अपमानास्पद शब्दांचा वापर केला होता. त्याविरोधात काँग्रेसने निवडणुक आयोगाकडे तक्रार केली होती. पण, निवडणुक आयोगाने त्यावर काहीच निर्णय घेतला नाही. दरम्यान, २३ एप्रिल रोजी गुजरात मधील सर्व २६ मतदारसंघात एकाच वेळी मतदान पार पडले. त्यानंतर आता मंगळवारी निवडणुक आयोगाने आपल्याकडे साचलेल्या तक्रारीवर सुनावणी घेऊन त्यात जीतू वाघाणी यांच्यावर ७२ तास प्रचारबंदी घातली असून ती २ मेपासून सुरु होणार आहे. मुळात आता ते कोठेच प्रचार करणार नसल्याने ही बंदी केवळ कागदोपत्री राहणार आहे.