वायनाडमधून राहुल गांधींना देणार ‘इलेक्शन किंग’ लढत

वायनाड : वृत्तसंस्था – द्रमुकचे करुणानिधी, अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता, एस. एम. कृष्णा, बंगारप्पा, एच. डी. कुमारस्वामी तसेच पंतप्रधान नरसिंह राव यांच्याविरोधात निवडणुक लढविण्याचे धाडस दाखविल्याने ‘इलेक्शन किंग’ म्हणून ओळखले जाणारे के. पद्मराजन हे आता आयुष्यातील २०१ वी निवडणुक काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध लढविणार आहेत.

आतापर्यंत एकही निवडणूक न जिंकता सर्वात अयशस्वी ठरले तरी ते ‘इलेक्शन किंग’ म्हणून ओळखले जात असून त्यांची सर्वात जास्त निवडणुका लढविणारा उमेदवार म्हणून लिम्का बुक आफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. आता ते गिनीज बुकात नोंद व्हावी, यासाठी नवा विक्रम रचण्याच्या तयारीत आहेत. वाहनांच्या टायरची विक्री करण्याचा व्यवसाय असलेले के. पद्मराजन यांना सामान्य माणूसही निवडणूक लढू शकतो हे आपल्या कृतीतून दाखवून देण्यासाठी ते १९८८ मध्ये मेत्तूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणुकीला उभे होते.

तामिळनाडूतील धर्मापूरी मतदारसंघातूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर ते आता वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्याविरुद्ध अर्ज दाखल करीत आहेत. सातत्याने निवडणुक लढविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे २०१५ मध्ये त्यांचे नाव गिनीज बुकाच्या वेबसाईटवर झळकले आहे. मात्र, अजून विक्रम केलेला नाही. त्यांनी १९९६ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकांत वेगवेगळ्या आठ मतदारसंघातून अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यानंतर निवडणुक आयोगाने एकाला फक्त दोन मतदारसंघातून निवडणुक लढविता येईल, असा नियम केल्याने त्यांचा विक्रम अजून झालेला नाही. आतापर्यंत पद्मराजन यांना सर्वाधिक ६ हजार ७२३ मते २०११ मध्ये मेत्तूर विधानसभा मतदारसंघात मिळाली होती. त्यांनी आतापर्यंत ३० वर्षात निवडणुकांवर ३० लाख रुपये खर्च केले आहेत.