‘सोशल’वरही प्रचाराची ‘धामधूम’ ! ‘आघाडी – बिघाडी’ Vs ‘महायुती – अधोगती’ पेजेस जोमात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (अक्षय भुजबळ) – सध्या राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचे वारे मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. अगदी धो धो पडणाऱ्या पावसात देखील उमेदवार उपलब्ध असेल त्या मार्गाने आपआपला प्रचार करण्यात व्यस्त आहेत. राज्यात आघाडी विरुद्ध महायुती असा जोरदार प्रचार सुरु आहे. सर्वच स्तरांवरून प्रचार मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. मात्र एक गोष्ट प्रामुख्याने या ठिकाणी पहायला मिळते सर्वच पक्षांकडून यंदाच्या प्रचारात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. एका जागेवर बसून अनेक लोकांपर्यंत पोहचण्याचा मार्ग म्हणजे सोशल मीडिया.

फेसबुकवर सुरु असलेल्या काही पेजेसची सध्या सर्वसामान्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. ज्याप्रमाणे स्वतःचा प्रचार करणे महत्वाचे आहे त्याप्रमाणे विरोधकांचा अपप्रचार करणे देखील महत्वाचे असते हे या पेजेसवरून दिसून येते. सध्या आघाडी विरद्ध युती असा सामना पहायला मिळतोय त्यामुळे फेसबुकवर सुरु असलेल्या ‘आघाडी – बिघाडी’ नामक पेजची सर्वत्र चर्चा आहे. त्याचप्रमाणे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यासाठीही ‘महायुती अधोगती’ नामक एका पेजची निर्मिती करण्यात आलेली आहे.

काय आहे नेमकं आघाडी – बिघाडी –

आघाडी बिघाडी पेजवरून विरोधात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच या मित्रपक्षांवर फार खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. केवळ काही फोटो आणि व्हिडिओमध्ये एडिटिंग करून अर्थात हे सर्व गमतीशीर असल्यामुळे सोशल मीडियावर याचा चांगलाच बोलबाला आहे. यावर विरोधात असलेल्या शरद पवार, अजित पवार काँग्रेसचे राहुल गांधी आणि इतर नेत्याबाबतचा मजकूर नेटकऱ्यांमध्ये व्हायरल केला जातो.

अशा प्रकारचे काही मेसेजस या पेजवरून व्हायरल केले जातात.

महायुती अधोगती म्हणजे काय ?

महायुती अधोगती या पेजवरून सत्ताधारी भाजप शिवसेनेवर निशाणा साधला जातो आहे. यात देखील महायुतीतील नेत्यांवर टीकात्मक व्यंग केले जात आहेत. तसेच महायुतीच्या नेत्याचे फोटो एडिट करून त्यावर मजकूर लिहून व्हायरल केले जात आहे. युतीतील सर्वच दिग्गज नेत्यांचा यामध्ये समावेश आहे.

यामुळे काय साध्य होणार ?
राजकारणात जेवढा स्वतःचा प्रचार महत्वाचा असतो तेवढाच विरोधकांचा अपप्रचार सुद्धा केला जात आहे. मात्र याचा खरंच कितपत परिणाम होईल हे सांगणे जरी कठीण असले तरी सोशल मीडियावर अनेक जण याकडे मनोरंजन म्हणून पाहत आहेत. तर यावरून आगामी काळात युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियाचे वॉरही होऊ शकते एवढे मात्र नक्की.

Visit : Policenama.com