पुण्यात खाजगी कंपनीच्या ई -बाईक्स भाडेतत्वावर देण्याचा ‘इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – व्हि -ट्रो मोटर्स प्रा.लि. या कंपनीने ग्रीन पुण्यासाठी ‘इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट’ अंतर्गत शहरात भाडेतत्वावर ई – बाईक्स आणि ५०० चार्जींग स्टेशन उभारणीचा निर्णय घेतला आहे. ‘व्यावसायीक’ पद्धतीने चालविण्यात येणार्‍या या प्रोजेक्टबाबत महापालिका प्रशासनाशी कुठलिही चर्चा न करता शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी यासंदर्भातील प्रस्ताव स्वत:च शहर सुधारणा समितीच्या बैठकीत ऐनवेळी मांडून मंजुरही करून घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

व्हि – ट्रो मोटर्स प्रा.लि. ही तीन महिन्यांपुर्वी स्थापन झालेल्या कंपनीने पहिल्या टप्प्यात विविध ठिकाणी ५०० ई बाईक्स भाड्याने देण्याची तसेच ५०० ठिकाणी चार्जींग स्टेशन उभारण्याची संकल्पना शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांच्याकडे मांडली. या ई – बाईकसाठी प्रत्येक कि.मी.ला ४ रुपये भाडेदर राहाणार असून एक दिवसभरासाठी १५० कि.मी.ला ४५० रुपये, आठवड्यासाठी एक हजार कि.मी.ला १९०० रुपये तर महिन्याभरासाठी ४ हजार कि.मी.साठी ३८०० रुपये दर आकारला जाणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात एका ठिकाणी १० ई बाईक्स उभ्या करण्यात येतील. तसेच विविध ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

व्यावसायीक पद्धतीने राबविण्यात या उपक्रमाला केवळ हरित पुणे या संकल्पेच्या गोंडस नावाखाली प्रशासनाशी कुठलाही पत्रव्यवहार, अधिकार स्तरावर चर्चा अथवा प्रकल्पाची उपयुक्तता व अन्य बाबी लक्षात न करताच ऐनवेळी स्वत: शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी स्वत:च बैठकीमध्ये ऐनवेळी प्रस्ताव मांडून बहुमताच्या जोरावर मंजूरही करुन घेतला. विशेष असे की प्रस्ताव मंजुर करण्यापुर्वी प्रशासकिय अभिप्रायही घेण्यात आलेला नाही. यामुळे भाजपसह अन्य पक्षाचे पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकार्‍यांमध्ये ‘प्रस्तावा’मागील उद्देशाबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समिती आणि तेथून मुख्य सभेकडे जाणार आहे. विशेष असे की व्हि – ट्रो या कंपनीचे एका फ्लॅटमध्ये कार्यालय असून मार्च मध्ये या कंपनीचे रजिस्ट्रेशन झालेले आहे.

प्रशासकीय पातळीवर निर्णय प्रक्रिया विलंबाने होते. शहराचे पर्यावरण चांगले राहावे यासाठी ई बाईक्सचा वापर अधिकाअधिक व्हावा यासाठी व्हि- ट्रो या कंपनीची संकल्पना सकारात्मक वाटली. यामुळे ई बाईक्स वापराला चालनाच मिळणार असून महापालिका प्रशासनाला कुठलिही तोषिस लागणार नाही, त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करून प्रकल्पाला चालना द्यायचा प्रयत्न केला आहे. अंमलबजावणीचा निर्णय स्थायी समिती आणि मुख्य सभेच्या मंजुरीनंतर होणार आहे. – अमोल बालवडकर, अध्यक्ष शहर सुधारणा समिती