‘सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं…’ ऊर्जा विभागानं 8 वेळा राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला, मात्र अद्याप प्रलंबित

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   वाढीव वीज बिलांच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक झाली आहे. वाढीव वीज बिलांबद्दल सोमवारपर्यंत (दि. 23) निर्णय घ्या. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढू आणि त्यानंतर अतिशय उग्र आंदोलन करू असा इशारा मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी ठाकरे सरकारला थेट इशारा दिला आहे. त्यानंतर दुसरीकडे ऊर्जामंत्री नितीन राऊत (nitin-raut) यांनी एका वृत्त माध्यमाशी बोलताना सरकारकडे प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्याचे म्हटले आहे.

उर्जा मंत्री राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ऊर्जा विभागाची परिस्थिती सांगितली आहे. सगळी सोंग करता येतील पण पैशाचे सोंग करता येत नाही, असे म्हणत आर्थिक अडचण असल्याचे ते म्हणाले. तसेच, केंद्र सरकारला मी माहिती दिली, तेव्हा 10 हजार कोटींची अनुदानाची मदत करा, अशी मागणी केली होती. मात्र, केंद्र सरकारने 10.11 टक्के व्याजदराने कर्ज देणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे राष्ट्रीयकृत बँका 6. टक्के दराने कर्ज देतात. मग, मला तुम्हीच सांगा सावकारी कोण करत आहे ? असे म्हणत राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. आम्ही 8 वेळा राज्य सरकारकडे प्रस्ताव (department-sends-proposal-state-government-8-times-still-pending) दिला होता. वित्त विभागाने दरवेळेस नवनवीन प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही ते प्रस्ताव सादर केल्याचेही राऊत यांनी म्हटले. आजही मंत्रिमंडळासमोर माझा प्रस्ताव प्रलंबित आहे, मी तो मागे घेतला नाही. वित्त विभागाने निर्णय करावा, असे राऊत यांनी म्हटले आहे.

राज्याच्या तिजोरीत किती पैसा आहे, हे माझ्यापेक्षा त्यांना माहिती आहे. त्यामुळे, वास्तव मांडणे हे त्यांचे काम आहे. कोरोनामुळे अर्थ विभागाचीही अडचण असू शकते, असे म्हणत राज्य सरकारचा बचाव करण्याचंही काम नितीन राऊत यांनी केले आहे. दरम्यान, वीज बिलप्रश्नी दिलासा देण्याचे आश्वासन ठाकरे सरकारने दिले होते. मात्र उर्जामंत्र्यांनी शब्द फिरवला. हा राज्यातल्या साडे अकरा कोटी जनतेचा विश्वासघात आहे. राज्य सरकारमध्ये मतभेद असतील. त्यांच्यात पक्षीय राजकारण असेल. मात्र त्याचा फटका जनतेनं का सहन करायचा, असा सवाल नांदगावकर यांनी उपस्थित केला. राज्यातल्या जनतेने वीजबील भरू नयेत, आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, असेही नांदगावर यांनी म्हटले आहे.