WNS मधील अभियंत्याचा जलतरण तलावात बूडून मृत्यू, तिघांविरोधात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रविवारी मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या डब्लूएनएस कंपनीमधील अभियंत्याचा खराडीतील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक रमेश बनसोडे (वय २६ ) असे मृत्यू झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. तर याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी जलतरण तलाव चालक शेखऱ मल्हारी जमादार(रा. समर्थनगर खराडी) व जीवरक्षक विजय संजय दळवी(रा. समर्थनगर खराडी) आणि जनक बहाद्दूर बिष्टा या तिघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक डब्लूएनएस कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करतो. तो रविवारी दुपारी मित्रांसोबत खराडीतील काव्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. त्याला पोहता येत नव्हते. त्यावेळी त्याचा तलावात बुडून मृत्यू झाला. परंतु जलतरण तलाव चालक शेखर जमादार यांनी तेथे कोणतीही बुडण्यापासून वाचविणारी साधने पुरविली नाहीत.

तर जीवरक्षक विजय दळवी व जनक बहाद्दूर बिष्टा यांनी त्याला बुडत असतानादेखील वाचविले नाही. त्यांनी निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्याने प्रतिकचा मृत्यू झाला. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चाऊस हे तपास करत आहेत.