‘मनसे’ आमदार पुत्राच्या गाडीला अपघात, कोकण रेल्वे मार्गावर कोसळली कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या मुलाच्या गाडीला डोंबिवलीमध्ये अपघात झाला. गाडी भरधाव वेगाने उड्डाण पुलावरुन थेट कोकण रेल्वे रुळावर कोसळली. बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. त्यात कारचे नुकसान झाले असून कोणतीही जिवित हानी झाली नाही.

मनसे आमदार राजू पाटील यांचा मुलगा आदित्य पाटील यांची गाडी पेट्रोल भरुन काटई नाका ते पलावा सिटी येथे निघाली होती. आदित्य पाटील हे मागे बसले होते. त्यावेळी एक्सपेरीया मॉल उड्डाणपुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट उड्डाणपुलाखाली असलेल्या कोकण रेल्वे रुळावर पडली. त्यामुळे तातडीने कोकण रेल्वे मार्गावरील दिवा ते पनवेल वाहतूक बंद करण्यात आली.

रात्री उशिरा रेल्वेमार्गावरुन कार बाजूला करण्यात आली असून त्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. अपघातग्रस्त कार ही मुश्तान्ग कंपनीची असून तिची किंमत ७५ लाख रुपये इतकी आहे. अपघातात आदित्य पाटील व त्यांच्या चालकाला दुखापत झालेली नाही. मात्र, कारचे मोठे नुकसान झाले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/