‘इस्टेट एजंट’चे BMWतून अपहरण ; १२ लाखांच्या वसुलीनंतर सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गाडी खरेदी करण्याच्या बहाण्याने बोलावून चौघांनी एका एजंटचे बीएम डब्ल्यु गाडीतून अपहरण केले. त्यांना पनवेलला नेऊन एक दिवस डांबून ठेवले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ५ लाख रुपये ट्रान्सफर करुन घेतले. त्यानंतर त्यांची स्काॅर्पीओ, सोन्याचे दागिनेसह १२ लाख ७ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.

याप्रकरणी आकाश नामदेव बेडगे (वय २७, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार १६ मे रोजी सायंकाळी ७ ते १७ मे सकाळी पावणेबारा वाजण्याच्या दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, आकाश बेडगे यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडील स्काॅर्पीओ विकायची होती. त्यासाठी त्यांनी ओएल एक्सवर तिची जाहिरात टाकली होती. त्यानुसार एकाने त्यांच्याशी संपर्क साधल होता. त्यानंतर त्यांनी येऊन गाडी पाहिली. चालवून गाडी कशी आहे, हेही पाहिले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी पैसे घेऊन येतो, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी फोन करुन त्यांना आळंदी फाटा येथे बोलावले. त्यानुसार १६ मे रोजी सायंकाळी सात वाजता ते त्या ठिकाणी गेले. तेथे गेल्यावर त्यांच्यातील एकाने बेडगे यांची गाडी चालविण्यास घेतली. आणखी दोघे जण त्यांच्या गाडीत बसले. गाडी साईदीप लॉन्सच्या समोर आली असताना त्यांना दोघांनी मारहाण करुन त्यांचे हात मोबाईलच्या वायरने बांधले.

मुंबईकडे घेऊन जाताना बी एम डब्ल्यु मोटारीत त्यांना घातले. त्यांना मारहाण करुन त्यांच्या अ‍ॅक्सीस बँकेच्या खात्यावरील ९० हजार रुपये एटीएममधून जबरदस्तीने काढून घेण्यात आले. त्यानंतर त्यांना पनवले येथे नेण्यात आले. तेथे त्यांना एका खोलीत डांबून ठेवण्यात आले व आणखी पैसे पाहिजेत, त्याशिवाय तुला सोडणार नाही असे धमकाविले. त्यानंतर त्यांनी त्यांचे नातेवाईक प्राची देसाई यांना फोन करुन त्यांच्या खात्यावर पैसे टाकायला सांगितले. त्यांनी पाच लाख रुपये बेडगे यांच्या खात्यावर टाकले. त्यानंतर त्यांना दुसऱ्या एका खात्यावर हे पैसे ट्रान्सफर करायला लावले. ते पैसे ट्रान्सफर केल्यानंतर त्यांना १७ मे रोजी पावणेबारा वाजता नवी मुंबईला सोडून दिले. त्यांची स्काॅर्पीओ गाडी, अंगावरील दागिने व रोख रक्कम असा १२ लाख ७ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.

चोरट्यांनी त्यांची सुटका केल्यानंतर ते घरी परत आले. त्यानंतर १८ मे रोजी त्यांनी चाकण पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे अधिक तपास करीत आहेत.