प्रेयसीसोबत दोन दिवस जरी एकत्र राहिलात तरी ‘लिव्ह इन’ : पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – लिव्ह इन रिलेशनशीप बाबत पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने खुप महत्वाचे वक्तव्य केले आहे. प्रियकर आणि प्रेयसी दोन दिवस जरी एकत्र राहिले तरी ते लिव्ह-इन रिलेशनशिप मानले जाईल, असे कोर्टाने म्हटले आहे. लिव्ह इन रिलेशनशीप म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीने जास्त काळ एकत्र राहणे असे आतापर्यंत समजले जात होते. मात्र, लिव्ह इन रिलेशनशिपसाठी नवी परिभाषा कोर्टाने ठरवली आहे. एका तरूणाने आपल्या जोडीदारास तिच्या पालकांकडून ताब्यात देण्याची मागणी केली होती. या प्रकरणावर सुनावणी करताना कोर्टाने हे स्पष्ट केले.

न्यायालयाच्या एकल खंडपीठासमोर यापूर्वी याचिकाकर्त्याने म्हटले होते की, जेव्हा प्रेयसीचे कुटुंबीय तिला जबरदस्तीने घेऊन जात होते, तेव्हा आपण प्रेयसीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होतो. परंतु, या खंडपीठाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, तरुणी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती याचा पुरावा नाही. याप्रकरणातील महिलेची बदनामी करण्याचे हे उद्दीष्ट आहे. दंड म्हणून महिलेला एक लाख रुपये द्यावेत.

त्यानंतर याचिकाकर्त्याने एकल खंडपीठाच्या आदेशांना विभागीय खंडपीठासमोर आव्हान दिले. या खंडपीठाने आपल्या आदेशात एक लाख रुपयांचा दंड माफ केला. मात्र मुलीला ताब्यात देण्याची विनंती मान्य केली नाही. याबाबत न्यायालयाने म्हटले की, तरुण केवळ 20 वर्षांचा आहे. 21 वर्षांचा होण्यापूर्वी मुलाचे लग्न होऊ शकत नाही.