पुलवामा हल्ला निवडणुकीपूर्वी घडवून आणलेला पूर्वनियोजित कट

माजी राज्यपालांचा मोदींवर धक्कादायक आरोप

भोपाळ : वृत्तसंस्था – मिझोराम राज्याचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजीज कुरैशी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ला म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडवून आणलेला पूर्वनियोजित कट असल्याचा धक्कादायक आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

तुम्ही नियोजन करून पुलवामा हल्ला तर घडवून आणलात. मात्र, ४० जवानांची हत्या करून त्यांच्या मृत्यूचे आपण राजकीय भांडवल म्हणून वापर करत असाल तर जनता ते तुम्हाला करू देणार नाहीत, असे अजीज कुरैशी यांनी म्हटले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलेच तापले आहे. याआधी काँग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खळबळजनक आरोप केला होता. ते म्हणाले होते, पुलवामा दहशतवादी हल्ल्यामगे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात फिक्सिंग आहे. हा हल्ला हातमिळवणी शिवाय शक्य नाही. यावर नरेंद्र मोदी यांनी खुलासा द्यायला पाहिजे.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली होती.