१० हजाराची लाच घेताना उत्पादन शुल्क विभागाचा कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शन च्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निरा विक्रीच्या परवान्याची मुदत संपल्यानंतर त्याचे नुतनीकरण होईपर्यंत कारवाई करु नये, यासाठी एका ताडी विक्रेत्यामार्फत १० हजार रुपयांची लाच घेताना उत्पादन शुल्क विभागाच्या शिपायाला सापळा रचून पकडण्यात आले.

सुमेध शिवाजी सरकटे (वय ३४, रा. शिव वैभव सोसायटी, ऐरोली, नवी मुंबई) आणि ताडी विक्रेता रमेश नारायण बंडी (वय ३८, रा. लोअर परेल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार यांचा निरा विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या विक्री परवान्याची मुदत संपल्याने त्यांनी नवीन परवाना मिळण्यासाठी अर्ज केला होता. तोपर्यंत कायदेशीर कारवाई करु नये, यासाठी अ‍ॅपेरा हाऊस येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील शिपाई सुमेध सरकटे याने १६ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांनी केलेल्या पडताळणीत तडजोड होऊन १० हजार रुपये लाच घेण्याचे सरकटे यांनी मान्य केले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. लोअर परेल येथील पुलाखाली किस्मत ताडी माडी केंद्र चालविणाऱ्या रमेश बंडी याच्यामार्फत १० हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.