विकेंड लॉकडाऊनला उर्त्स्फुत प्रतिसाद ! पुण्यासह संपूर्ण राज्यात सर्व व्यवहार बंद, दादरचा भाजी बाजार केला बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनला संपूर्ण राज्यात नागरिकांकडून उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी अपवाद वगळता सर्वत्र बंद दिसून आला आहे.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कडकडीत बंद दिसून येत आहे. राज्यात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली असली तरी पुण्यात सायंकाळी ६ वाजताच हा लॉकडाऊन सुरु झाला. सायंकाळी सर्व दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती. अनेक दुकानांमध्ये दुध व भाजीपाला संपलेला आढळून येत होता. दोन दिवस लॉकडाऊन असल्याने अनेकांनी दोन दिवसांसाठी शुक्रवारीच दुध व इतर खरेदी केली.

पुण्यात रात्री ७ नंतर शुकशुकाट दिसून येत होता. पोलिसांनी शहरात ९६ ठिकाणी नाकाबंदी केली असल्याचे सांगितले जात असले तरी ते सायंकाळनंतर रात्री काही वेळच पोलीस रस्त्यावर दिसून येत होते. मागील लॉकडाऊनप्रमाणे २४ तास कडक बंदोबस्त दिसून येत नव्हता. तुरळक ठिकाणी तरुण एकत्र जमून गप्पा मारताना दिसत होते.

शनिवारी सकाळपासून सर्वत्र बंद दिसून येत आहे. दुध घेण्यासाठी पडलेले काही नागरिक वगळता सर्वत्र बंदचे वातावरण आहे.

दादरचा भाजी बाजार केला बंद
मुंबईत सर्व प्रकारची दुकाने बंद असल्याचे चित्र शनिवारी सकाळी दिसून येत आहे. त्याचवेळी दादरच्या भाजी बाजारात मात्र पहाटेपासून गर्दी झाल्याचे आढळून आले. भाजी विक्रेते आणि संपूर्ण शहरातून खरेदीसाठी छोटे मोठे व्यापारी आल्याचे दिसून आले. ही माहिती महापालिका व पोलिसांना समजताच अतिक्रमण विभागाने कारवाई करीत हा भाजी बाजार बंद करायला लावला.

विकेंड लॉकडाऊनमध्ये दुध विक्री आणि मेडिकल यांनाच परवानगी देण्यात आली आहे. दुध विक्रीही सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहे. इतर अत्यावश्यक सेवेतील किराणा माल, बेकरीसह सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहे.

विकेंड लॉकडाऊनमध्ये लसीकरण सुरु राहणार आहे. घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वंयपाकी, ज्येष्ठ नागरिक आणि घरी अजारी असणार्‍या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस, परिचारिका यांना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते रात्री १० वाजता या वेळेत प्रवास करण्यास मुभा राहील.
स्पर्धा परीक्षेमुळे महापालिका क्षेत्रातील सर्व खानावळी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत केवळ पार्सल सेवेसाठी सुरु राहणार आहेत.

ज्या बांधकामांच्या ठिकाणी मजुरांच्या राहण्याची सोय आहे. ती बांधकामे सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी पीएमपी तसेच ओला उबेर टॅक्सी सेवा सुरु राहणार आहे.