‘इंडिया टुडे’चा Exit Poll : पवार-फडणवीसांच्या ‘जुगलबंदी’त ‘यांनी’ मारली बाजी !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. ‘इंडिया टुडे’च्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीला 38 ते 42 तर महाआघाडीला 6 ते 10 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून महाआघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

लोकसभा निवडणूक यंदा कोणत्या मुद्द्यांनी गाजली ?

पश्चिम महाराष्ट्र

लोकसभेची हि निवडणूक विविध मुद्यांनी गाजली. परंतु या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय जुगलबंदीने निवडणुकीत रंगत आणली. पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा प्लॅन देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आखण्यात आला होता. माढा, सातारा आणि बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व 10 जागा आम्ही जिंकणार आहोत, असा दावा भाजपकडून करण्यात आला.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या माढा, बारामती, सातारा, कोल्हापूर यासह भाजप-शिवसेना युतीने जिंकलेल्या पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. 2014 च्या निवडणुकीत युतीने मुसंडी मारत या भागात काँग्रेस-राष्ट्रवादीला पहिला झटका दिला. या निवडणुकीत तर हे 10 मतदारसंघ जिंकण्याचा मानस मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला होता.

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 8 जागा आहेत. त्यात नगर दक्षिण, शिर्डी, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, दिंडोरी आणि रावेर या मतदारसंघांचा समावेश आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीनं उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी सर्व जागा कायम राखणं भाजपसाठी आव्हान असणार आहे. कारण यंदा प्रत्येक मतदारसंघात अटीतटीची लढत होत आहे.

कोकण

कोकण म्हंटल की, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांचं नाव
पुढं येतं. पण सध्या नारायण राणेंची राजकीय अडचण झाल्याच पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचेच वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला होता. त्यामुळे राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे, असं बोललं जाऊ लागलं.

कोकण आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत मुलगा निलेश राणे यांना विजयी करणं राणेंसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कारण काही महिन्यांतच राज्यात विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. अशावेळी राज्यातील सत्तेत काही वाटा मिळवायचा असल्याचं स्वबळावर काही आमदार निवडून आणणं राणेंसाठी महत्वाचं असणार आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत काय घडलं ?

नरेंद्र मोदी यांची मोठी लाट मागील लोकसभा निवडणुकीत निर्माण झाली होती. त्या लाटेमुळेच काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपला देशभरात ऐतिहासिक असा मोठा प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेनेनं मोठी आघाडी घेतली होती. दुसरीकडे, तेव्हा सत्तेत असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला होता.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत कुणाला किती जागा मिळाल्या?

भाजप – 23

शिवसेना – 18

राष्ट्रवादी – 4

काँग्रेस – 2

स्वाभिमानी शेतकरी संघटना – 1

2009 च्या निवडणुकीत काय होतं चित्र ?

या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेली युपीए दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जात होती. पण या निवडणुकीत युपीएला फारसा फटका बसला नाही. महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने चांगली कामगिरी केली.

कुणाला किती जागा मिळाल्या?

काँग्रेस- 17

राष्ट्रवादी – 8

शिवसेना – 11

भाजप – 9

स्वाभिमानी शेतकरी संघटना – 1

बहुजन विकास आघाडी – 1

अपक्ष – 1