Aadhaar नोंदणी करण्यासाठी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आधार कार्ड एकच आणि दोन वेगळ्या विद्यार्थ्यांची नावं आणि अस्तित्वात नसलेले आधार क्रमांक नोंदणी झाल्याचं लक्षात आल्यानं आता शालेय शिक्षण विभागानं इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा आधार नोंदणी आणि अद्ययावत करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली आहे.

विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांचा लाभ त्यांना घेता यावा म्हणून सरल प्रणालीत विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंदणी करणं आवश्यक आहे. या शैक्षणिक वर्षात (2020-21) वयाची 5 किंवा 15 वर्षे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आधार नोंदणीत बायोमेट्रीक अपडेटद्वारे अद्ययावत करणं आवश्यक आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होईपर्यंत आधार नोंदणीसाठी राज्यात उपलब्ध असलेल्या तहसिल कार्यालय, बँक आणि टपाल कार्यालय अशा पर्यायी व्यवस्थांचा वापर करून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणाचे काम 31 मार्चपर्यंत शाळा व्यवस्थापनानं करावं असा आदेश शालेय शिक्षण विभागानं परिपत्रकाद्वारे दिला आहे.

शाळांनी आधार नोंदणी करताना ही काळजी घ्यावी

– आधार नोंदणी करताना गर्दी होणार नाही, सुरक्षित अंतर ठेवून किंवा 50 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित रहणार नाहीत असं नियोजन करावं.

– खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा यातील पटसंख्या जास्त असलेल्या शाळांना प्राधान्य द्यावं.आ

– एकूण 816 आधार नोंदणी संच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत गटसाधन केंद्रावर उपलब्ध करून दिले आहेत.

– आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणासाठी संबंधित तहसिदार आणि प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय साधावा.

राज्यातील शाळांची संख्या – 1,10,315
विद्यार्थी संख्या – 2,25,60,578
विद्यार्थ्यांसाठी योजना – शालेय पोषण आहार योजना, मोफत गणवेश योजना, मोफत पाठ्यपुस्तक योजना आदी
सरल प्रणालीत आधार नोंदणी प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या – 64,59,388