अतिवृष्टीचा तडाखा, सोलापूर जिल्ह्यातील 570 गावे बाधित

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल 570 गावे बाधित झाली आहेत. यामुळे 4895 घरात पाणी शिरल्याने हजारो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. अतिवृष्टीमुळे 14 जणांचा मृत्यू झाला असून 478 पेक्षा अधिक जनावरे दगावली आहेत. तर 1715 पेक्षा अधिक घरांची पडझड झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

अतिवृष्टीचा फटका शेती पिकाला देखील बसला आहे. याची सविस्तर माहिती घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील अनेक नदीकाठच्या गावांना पाण्याने वेढा दिला आहे. त्या ठिकाणी पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. संभाव्य गरज ओळखून कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी सहा टीम मागवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली आहे.

अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका

अतिवृष्टीचा फटका सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांना बसला आहे. यामध्ये दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील रामपूर, मुस्ती, तांदूळवाडी या गावांत काही लोक पुराच्या पाण्यामध्ये अडकल्याची माहिती प्रशासनाला मिळताच त्या ठिकाणी आधुनिक बोटींसह एनडीआरएफचे जवान दाखल जाले आहेत. या ठिकाणी अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवण्यात आले आहे.

मोहोळ तालुक्यात रेस्क्यू ऑपरेशन सुरु

मोहोळ तालुक्यातील सासुरे, घाटणे, अर्जुनसोंड, रामहिंगणी, नांदगाव, आष्टी या गावातही काही लोक पाण्यात अडकून पडल्याने त्या ठिकाणीही रेस्क्यू ऑपरेशन सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच जिल्ह्यातील धोकादायक असणाऱ्या जिल्हा तसेच राज्यमार्ग मिळून 180 रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.

पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

परिस्थितीचा अंदाज घेऊन ती पुन्हा सुरळीत करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर तहसीलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी तसेच पोलिस प्रशासनाला दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच भीमेसह काही नदींचा प्रवाह मोठा असल्याने आणखीन काही ठिकाणी वाहतूक थांबवण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याची सविस्तर माहिती घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.