पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला फेसबुकची मैत्री पडली महागात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला फेसबुकची मैत्री चांगलीच महागात पडली आहे. अमेरिकेतील फेसबुक मित्राने या बांधकाम व्यावसायिकाला रियल इस्टेटमध्ये गुंतवणीकीचे अमिष दाखवून ४७ लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी पुणे सायबर सेलच्या पथकाने एका नायजेरीयन नागिराकाला दिल्ली येथून अटक केली आहे.

उसेन जोशुभा ओगागा ओघेन (वय 26, रा. ग्रेटर नोएडा, मुळ नायजेरिया) असे त्याचे नाव आहे. तो नोएडा इंटरनॅशनल विद्यापीठात एम टेक सॉफ्टवेअर इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे.त्याने महिलेचे नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल तयार करुन फिर्यादीशी मैत्री करुन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून दोन लॅपटॉप व तीन मोबाईल जप्त केले आहेत. याप्रकरणी हरनिश हिंमतलाल शहानपुरीया (वय 59, रा़ शंकरशेठ रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची अमेरिकेतील अ‍ॅलेशिया स्मिथ या महिलेशी फेसबुकवर घटनेपूर्वी 3 महिने अगोदर ओळख झाली होती़ त्यातून तिच्याबरोबर चॅटिंग सुरु केले़ त्यांच्या व्यवसायात भागीदारी करण्याबाबत तिने विचारले. त्यावर शहानपुरीया यांनी संमती दर्शविली. तेव्हा तिने त्यासाठी भारतात येत असल्याचे सांगितले. 6 जून 2018 रोजी ती भारतात आली असून तिला दिल्ली विमानतळावर कस्टमने अडविले आहे. तिच्या सोडवणुकीसाठी तिने शहानपुरीया यांच्याशी चॅटींग करुन वेगवेगळ्या बँक खात्यावर एकूण 47 लाख 7 हजार 800 रुपये भरायला सांगितले़ त्यांनी या महिलेने संपर्क तोडला़ आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

या गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेलकडून करण्यात येत होता़ तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी उत्तर प्रदेशातील नोएडा येथे असल्याचे समजले़ त्यावरुन सायबर सेलकडील पोलीस निरीक्षक संतोष बर्गे, उपनिरीक्षक किरण औटी व अलका जाधव, पोलीस कर्मचारी सरीता वेताळ, बाबासाहेब कराळे, नितेश शेलार, शिरीष गावडे, संतोष जाधव, ज्योती दिवाणे यांनी तपास करुन ग्रेटर नोएडा येथून नायजेरियन नागरिकाला अटक केली़ त्याने अशा प्रकारे आणखी काही जणांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे.