Video : परमबीर सिंहांच्या गृहमंत्र्यांवरील 100 कोटी वसुलीच्या टार्गेटच्या आरोपानंतर फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सचिन वाझे प्रकरणी बदली केलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंह यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी वाझे यांना महिन्याला 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप केल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंह यांनी लिहिलेले पत्र हे केवळ खळबळजनक नाही तर हे धक्कादायक आहे. राज्याच्या इतिहासात डीजी रँकच्या अधिकाऱ्याने इतक्या खुलेपणे गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचे पत्र लिहण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पत्रात त्यांनी एक चॅट जोडली आहे, हा थेट पुरावाच दिसत आहे. ज्यामधून अशाप्रकरे पैशांची मागणी झाली आहे. त्यामुळे एकुणच हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे फडणवीस म्हणाले.

या प्रकरणात गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली पाहिजे. पण जो पर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होत नाही, तोपर्यंत हा सगळा जो विषय आहे. हा महाराष्ट्राची मान खाली घालणारा आहे. मुंबई पोलीस दलाला बदनाम करणारा हा सगळा प्रकार आहे. म्हणून या प्रकरणाला गांभीर्याने पाहिजे. हा कुणी साधारण व्यक्तीने केलेला आरोप नाही, म्हणून आम्हाला असे वाटते की, याप्रकऱणी तात्काळ कडक कारवाई करावी, असे फडणवीस म्हणाले. जर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांच्या नजरेस हे आणून दिले असताना गृहमंत्र्यावर त्यांनी कारवाई करायला हवी होती. कदाचित आपल सरकार वाचवण्याच्या नादात किंवा यातून आपल सरकार जाऊ शकत असा संशय असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले असेल. पण अशा प्रकरणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे राज्य धोक्यात टाकण्यासारखे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.