पुण्यातील रस्त्यांवर बनावट नंबर प्लेटच्या मोटारसायकली फिरत असल्याची चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात विना हेल्मेट, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभे करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीमार्फत वाहतूक नियमभंगाची कारवाई केली जाते व दंडाचे चलन संबंधित गाडीच्या मालकाला मोबाईल फोनवर एसएमएसद्वारे पाठविले जाते. शहरात अनेक गाड्या या बनावट नंबरप्लेट लावून चालविल्या जात आहे त्यामुळे मुळ मालकाने नियमभंग केला नसला तरी त्याच्या नावावर दंडाची पावती फाडली जात असल्याचे आढळून आले आहे.

हा अनुभव अल्तामश झुबेर मोमीन यांना आला आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी वाहतूक शाखेकडून ज्योती चौक येथे झेब्रा क्रॉसिंगवर दुचाकी उभी केल्याबद्दल २०० रुपये दंडाची पावती आली. त्यांनी या दंडाच्या पावतीबरोबर आलेला फोटा पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. त्या पावतीवर मोटारसायकलचा नंबर एमएच १२ डी. यु. २०२३ हा होता. हा नंबर त्यांच्याकडील गाडीचा होता. पण, फोटोत मात्र त्यांची गाडी दिसत नव्हती त्याऐवजी एसप्लेडर मोटारसायकल दिसत होती. त्यांच्याकडे तर हिरो होंडा मोटारसायकल आहे. तिचा पुढील बाजूला नंबरप्लेट मडगार्डवर लिहिलेला आहे. तर दंड झालेल्या गाडीला स्वतंत्र नंबरप्लेट आहे.

अशाच प्रकारे त्यांना वाहतूक शाखेने नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी आणखी एक धक्का दिला. त्यांच्या नावावर विना हेल्मेट वाहन चालविल्याबद्दल ५०० रुपयांची दंडाची पावती पाठविली आहे. या पावतीसोबतचा फोटो पाहिल्यावर त्यांना आणखी एक धक्का बसला. कारण त्यांच्याकडे एमएच १२ आर जे ३०१८ या नंबरची रॉयल इन्फील्ड ही मोटारसायकल आहे.

पोलिसांनी मात्र एका स्कुटीवर दंडात्मक कारवाई करुन त्याची पावती मोमीन यांच्या नावाने फाडली आहे. हे दोन प्रकार पाहता पुणे शहरात बनावट नंबरप्लेट लावून उघडपणे मोटारसायकल, स्कुटी फिरत असल्याचे समोर आले आहे. याबाबत वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी यावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/