लोकसभा 2019 : राम मंदिरासाठी ‘हे’ बाबा १७ व्यांदा उतरले निवडणुकीच्या रिंगणात

१९७७ पासून लढवत आहेत निवडणुका

मथुरा : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर भारतात राम मंदिर बांधण्याच्या मुद्द्यावरुन भाजपने राजकारण करुन आपले स्थान भक्कम केले आहे. पण, त्यांच्या अगोदरपासून राम मंदिर बांधण्यासाठी ८० वर्षांचे फक्कड बाबा लोकसभा निवडणुका लढवत आहेत. १९७७ पासून त्यांनी आतापर्यंत १६ वेळा निवडणुका लढविल्या असून प्रत्येक वेळी त्यांची अनामत जप्त झाली आहे. तरीही आता १७ व्या वेळा ते मथुरामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आपल्याला आपल्या गुरुने दिलेल्या आदेशाचे पालन करीत असून मला २० व्या वेळी यश मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मथुरा लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री हेमामालिनी दुसऱ्यांदा आपले नशीब अजमावत असून त्यांची राष्ट्रीय लोकदलाचे उमेदवार कुंवर नरेंद्र सिंह यांच्याशी टक्कर होणार आहे.

मथुरातील श्रीकृष्ण जन्मस्थानापासून जवळच असलेल्या गोविंदनगर येथील गर्तेश्वर महादेव मंदिरात त्यांचा मुक्काम असतो. तेथे ते भजन, कीर्तन व रामायण पाठ लोकांना सांगून आपले जीवन व्यतित करीत असतात. अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिराचे निर्माण व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. या गोष्टीच्या प्रचारासाठी ते सर्व प्रथम १९७७ साली लोकसभा निवडणुकीत उतरले होते. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत ते उमेदवारी अर्ज दाखल करतात. लोकांकडून निधी गोळा करुन ते अनामत रक्कम भरतात व त्यातूनच ते प्रचार करीत असतात.