इंदोरीकर महराजांच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ वक्तव्यावरून FIR दाखल

अहमदनगर  : पोलीसनामा ऑनलाइन – कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी किर्तनातून प्रसुतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा (PCPNDT) भंग कल्याच्या आरोपांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादेवरून संगमनेर कोर्टात गुन्हा दखल करण्यात आला आहे. संगमनेर येथील कोर्टासमोर आज हे प्रकरण सुनावणीसाठी येणार असून न्यायालयाच्या परवानगी दिल्यानंतर त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.

इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनात ‘स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या कीर्तनाचा व्हिडीओ युट्युब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ इतर सोशल माध्यमांवर चांगलाच गाजला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली होती.

इंदोरीकर महाराजांनी केलेल्या विधानावरून त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22 चं उल्लंघन असल्याचा आरोप करत अहमदनगर इथल्या पीसीपीएनडीटी च्या सल्लागार समितीच्या सदस्यांनी त्यांना नोटीस पाठवली होती. यावर इंदोरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांमर्फत आपली बाजू मांडली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांची नोटीस दिली होती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल अशी नोटीस दिली होती. त्यामुळे अखेर 19 जूनला संगमनेर इथल्या वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांनी कोर्टात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, या प्रकरणात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या देखील आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी आपल्या वकिलामार्फत इंदोरीकर महाराजांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. वादग्रस्त विधानाप्रकरणी 10 दिवसांत माफी मागा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. इंदोरीकर महाराज यांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी खेद व्यक्त केला होता. मात्र, तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर यांच्याकडे माफी मागण्याची मागणी केली होती.