अन्यथा भावाच्या अस्थी मातोश्रीवर पाठवणार, ‘त्या’ शेतकऱ्याच्या कुटुंबियांचा इशारा

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – भावाने आत्महत्या केली. चार दिवस उलटूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीस अधिक्षकांना निवदेन देऊनही काही झाले नाही. सर्वांना निवडणूक महत्वाची वाटते. याप्रकरणी जर प्रशासनाने कारवाई केली नाही तर भावाच्या अस्थी मातोश्रीवर आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठविणार असल्याचा इशारा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी दिला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तळवडे येथील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आपली आर्थिक फसवणूक केल्याने मानहानी सहन करावी लागत असल्याने त्याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले होते.

सध्या लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरु आहे. त्यात ही आत्महत्येची घटना समोर आली. त्यानंतर मराठवाड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदधव ठाकरे यांच्या अनेक ठिकाणी प्रचार सभा झाल्या. परंतु त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही.

यासंदर्भात दिलीप ढवळे यांचे भाऊ राज ढवळे म्हणाले की, आत्महत्या केल्यानंतर अद्याप गुन्हा दाखल केला नाही. मृतदेह गुन्हा दाखल होईपर्यंत ताब्यात न घेण्याचा सल्ला नातेवाईकांनी दिला होता. मात्र निवडणूका सुरु असल्याने अधिकाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्हबी हे केलं नाही. परंतु गेल्या चार दिवसांपासून पोलीस ठाण्यात चकरा मारूनही कोणीच दखल घेत नाही. सोमवारी पोलीस अधीक्षकांनाही भेटलो. त्यांना कारवाईची विनंती केली. तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई केली जाऊ शकते.

येत्या काही दिवसांत जर यावर काहीच कारवाई झाली नाही. तर भावाच्या अस्थी पोलीस ठाण्यात विसर्जित करून त्या मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि जिल्हाधिकारी यांना पाठवणार आहे. असा इशारा त्यांनी दिला.