राहुल गांधी आणि कुटुंब Part Time राजकारण करतात, त्यांना शेतकर्‍यांशी काही देणे-घेणे नाही; भाजपचा कॉंग्रेसला टोला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Chief Minister Ashok Gehlot) यांनी शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनाच्या समर्थनार्थ केलेल्या विधानावर भाजपने पलटवार केला आहे. भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब पार्ट टाईम राजकारण करतात आणि त्यांना तसेच गेहलोत यांना शेतकऱ्यांशी काही देणे- घेणे नसल्याचे राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया (state president of bjp rajasthan satish poonia) यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शेतक-यांच्या 8 डिसेंबरच्या भारत बंदचे समर्थन केले आहे. मात्र, यावेळी भारत बंद नाही, तर भारत खुला होण्याची आवश्यकता आहे, असे पुनिया म्हणाले. जगात खुल्या मनाने, खुला भारत नवा भारत आणि प्रगतीच्या मार्गावर चालावा यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे. राहुल गांधी यांनी हे शेतकऱ्यांचे समर्थक असल्याचे म्हटले आहे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार केल्याचे विधान गेहलोत यांनी केले आहे.

.. तर त्यांनी राजस्थानातील शेतक-यांची दखल घ्यावी

राजस्थानातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार, या प्रश्नाचे उत्तरही अशोक गेहलोत देत नाहीत. जर ते खरोखरच शेतकऱ्यांचे हितचिंतक असतील, तर त्यांनी राजस्थानातील शेतकऱ्यांची दखल घेतली पाहिजे, असे पुनिया यांनी म्हटले आहे.

आंदोलनकर्ते शेतकरी खरे वाटत नाहीत, कृषी राज्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी किमान समर्थन मूल्य कायम ठेवण्याबाबत केंद्र सरकार लिखित आश्वासन देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र, हे सांगत असताना मंत्र्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. “आंदोलन करणारे शेतकरी हे खरे शेतकरी असल्याचे आपल्याला वाटत नाही. शेतात काम करणारे खरे शेतकरी याबाबत चिंतेत आहेत, असे आपल्याला वाटत नसल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे. तसेच मला वाटते की, राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे आणि विरोधी पक्ष शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम करत आहेत. काही राजकीय लोक आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत.