आंदोनकर्त्या शेतकर्‍यांना भेटण्यासाठी गेलेल्या खा. सुप्रिया सुळेंसह 15 विरोधी खासदारांना गाझीपूर बॉर्डवरच पोलिसांनी रोखलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या 72 दिवसांपासून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणा-या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गेलेल्या विरोधी पक्षाच्या 15 खासदारांना पोलिसांकडून गाझीपूर सीमेवरच रोखण्यात आले आहे. या खासदारांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेण्यापासून अडविण्यात आले असून यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, द्रमुक खासदार कनिमोळी, अकाली दल खासदार हरसिमरत कौर बादल यांचाही समावेश आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिरोमणी अकाली दल, द्रविड मुन्नेत्र कळघ आणि तृणमूल काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, क्रांतिकारी सोशलिस्ट पार्टी आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग या पक्षांच्या 15 खासदाराचा यात समावेश आहे. सुरक्षा यंत्रणेला विनंती करूनही या खासदारांना शेतकऱ्यांना भेटण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट न घेताच त्यांना माघारी परतावे लागले आहे.

केंद्रात भाजपासोबत सत्तेत राहिलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. तसेच भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या खासदारांना रोखले जातयं, हा लोकशाहीसाठी हा एक काळा दिवस असल्याचे ट्विट कौर यांनी केले आहे. आंदोलनस्थळी बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करण्याचा प्रयत्न या खासदारांनी केला. परंतु, नेत्यांना पोलिसांनी बॅरिकेडिंग पार करून आंदोलन स्थळावर जाण्याची परवानगी नाकारल्याचे हरसमिरत कौर बादल यांनी म्हटले आहे.