महाजनादेश रॅली दरम्यान इस्लामपूरमध्ये ‘कडकनाथ’ कोंबड्या फेकल्या

इस्लामपूर : पोलीसनामा ऑनलाईन – कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान कडकनाथ कोंबड्या फेकल्या. महाजनादेश यात्रा आज सांगली मध्ये आली असून ताकरी-पलूस रोडवर स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रॅलीवर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकली. अंडी आणि कोंबड्या फेकून स्वाभिमानीचे कार्यकर्ते तेथून फरार झाले असून या घटनेमुळे काही वेळ तणावाचे वातवरण होते.

‘कडकनाथ कोंबडी पालन’ व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ‘महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ने राज्यभरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचे प्रकरण पुढे आले असून कंपनीच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत याच्यावर 72 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोतवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटण तालुक्यातील 72 शेतकऱ्यांची एक कोटी 48 लाख 43 हजार 519 रुपयांची फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात सागर खोत यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like