UP च्या फर्रूखाबादमध्ये ‘ऑपरेशन मासुम’ यशस्वी ! 23 मुलांची सुटका तर माथेफिरुचा ‘चकमकीत’ मृत्यू, पोलिसांना 10 लाखाचे ‘बक्षीस’

फरुखाबाद : वृत्त संस्था  – २३ मुलांना ओलीस ठेवणारा माथेफिरु पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला आहे. सर्व मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबादमधील कठरिया गावात सुभाष बाथम याला उत्तर प्रदेश पोलीस आणि एटीएसच्या पथकाने केलेल्या गोळीबारात ठार केल.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुभाष बाथम याने गुरुवारी दुपारी मुलीचा वाढदिवस असल्याचे सांगून २३ मुलांना घरात बोलावले. त्यानंतर त्याने त्यांना घराच्या बेसमेंटमध्ये कोंडून ठेवले होते. या मुलांबरोबर त्याने आपली पत्नी व स्वत:च्या मुलालाही कोंडले होते. सुभाष बाथम याने दोन वर्षांपूर्वी एका नातेवाईकाची हत्या केली होती. त्यातून तो जामीनावर सुटला होता. आपल्या मुलाला घेण्यासाठी एक महिला त्याच्या घरात जाण्याचा प्रयत्न करीत असताना हा प्रकार उघड झाला.

मुलांना ओलीस ठेवल्याचे समजल्यावर लखनौहून एटीएसचे एक पथक व जिल्हा पोलिसांचे पथक गावात पोहचले. सुभाष हा तेथील आमदारांशी बोलायचे असल्याचे सांगत होता. सुभाषकडे रिव्हॉल्व्हर असल्याने तसेच मुलांना त्याने ओलीस ठेवले असल्याने पोलिसांच्या कारवाईला मर्यादा होत्या. आमदारांना बोलावले.पण त्यांच्याशी बोलण्यास त्याने नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या एका नातेवाईकाला बोलण्यासाठी घरात पाठविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने त्याच्यावर गोळीबार करुन जखमी केले. सुभाष बाथम याने आपल्या मागण्या एका कागदावर लिहून तो घराबाहेर फेकला होता. तो जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला होता.

या घटनेनंतर एटीएसचे पथक पुढे सरसावले. त्यांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने घरातून ६ गोळ्या झाडल्या. यावेळी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात सुभाष याचा मृत्यु झाला. सुमारे १० तास हे  ऑपरेशन सुरु होते. मध्यरात्री पोलिसांच्या गोळीबारात सुभाष ठार झाला. ही घटना समजल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पोलिसांशी संपर्कात होते. ऑपरेशन मासुम यशस्वी करणाऱ्या पोलीस पथकाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.