खळबळजनक ! लग्नाच्या बोलणीसाठी बोलावून बापाकडून मुलाच्या प्रेयसीवर बलात्कार

चेन्नई : वृत्तसंस्था – वडील आणि मुलाच्या नात्यात प्रचंड विश्वास असतो. मात्र, तामिळनाडूतील नागपट्टिणम जिल्ह्यातील वेदारण्यममध्ये वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आपल्याच मुलाचा विश्वासघात करत मुलाच्या प्रेयसीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आरोपी वेदारण्यमजवळच्या सेम्बोदाइचा निवासी असून त्याचे गारमेंटचे दुकान आहे. आरोपीचा मुलगा आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. दरम्यान कॉलेजला असताना त्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. दोघेही क्रीडा साहित्य विकणाऱ्या एका दुकानात काम करतात. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र मुलाच्या वडिलांनी त्यांच्या या नात्याला विरोध केला. त्यांनतर आरोपीने त्या दोघांना वेगळे करण्याचा कट रचला. त्यानुसार त्याने मुलीशी संपर्क साधून लग्नाची बोलणी करण्यासाठी तिला सेम्बोदाइ येथे बोलावून घेतले.

मुलगी प्रियकराच्या वडिलांवर विश्वास ठेवत त्यांच्या घरी गेली. मुलगी घरी पोहोचल्यानांतर आरोपीने तिचा मोबाइल हिसकावून घेत जबरदस्तीने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले आणि तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नव्हे तर आरोपीने दोन दिवस पीडितेला घरात डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार केला.

मुलाला हा प्रकार समजताच तो मंगळवारी रात्री घरी आला आणि मुलीची सुटका केली. त्यानंतर दोघांनी वेदारण्यम पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.