धक्कादायक ! पुण्यातील धनकवडीत ‘पोरी’चा खून करून ‘बापा’ची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पोटच्या आठ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर बापाने स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात ही घटना घडली असून बापाने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. खून आणि आत्महत्या प्रकरणा मागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

श्रद्धा आशिष भोंगळे (वय ८, रा. काशिनाथ पाटीलनगर, धनकवडी) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. तिचा खून करून आशिष भोंगळे (वय ४९) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी रविवारी रात्री सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष हा चालक म्हणून काम करतो. त्याच्यात आणि पत्नीमध्ये कौटुंबिक वाद असल्याने दोघे वेगवेगळे राहतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आशिष दोन मुलं आणि आई धनकवडीतील काशिनाथ पाटील नगर येथे राहतात. शनिवारी सायंकाळी आशिषची आई कामासाठी बाहेर गेली त्यावेळी श्रद्धा आणि आशिष घरामध्ये होते.

आशिषने पहिल्यांदा श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने आई घरी आली असता श्रद्धा बेशुद्धवस्थेत आढळून आली. तर आशिषने गळफास घेतल्याचे दिसून आले. दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले. श्रद्धाच्या शवविच्छेदन अहवालामध्ये गळा दाबून खून करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले. यानंतर रविवारी रात्री सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांनी घटनास्थळी भेट दिली. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like