#Video व्हायरल : तोकडे कपडे घालणाऱ्या मुलींवर रेप व्हायला पाहिजे, एका महिलेच्या वक्तव्याने खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारावर मुलीचे राहणीमान किंवा त्यांचे कपडे हे कारणीभूत नसतात तर अत्याचार करण्याची मानसिकताच याला जबाबदार असते मात्र अजूनही ही गोष्ट अनेकांच्या पचनी पडत नाही. आजही असे काही महाभाग असतात ज्यांना वाटते की कपड्यांमुळे मुलींवर अत्याचार होतात. असाच काहीसा किस्सा दिल्लीतल्या एका रेस्टोरंटच्या बाहेर घडलेला पाहायला मिळाला. पण या घटनेत चक्क एका महिलेनं मुलींना ‘शॉर्ट ड्रेस घालणाऱ्या मुलींवर रेप व्हायला पाहिजे’ असे वक्तव्य केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

त्याचे झाले असे की, दिल्लीतल्या काही मुलींचा ग्रुप एका रेस्टोरंटमधून चालला होता. तेव्हा पन्नाशीतल्या एका स्त्रीने काही शॉर्ट ड्रेस घालून जाणाऱ्या मुलींना पाहून ‘शॉर्ट ड्रेस घालणाऱ्या मुलींवर रेप व्हायला पाहिजे’ असे वक्तव्य केले. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत या बाई म्हणताना दिसत आहेत की, “या मुली तोकडे कपडे घालून लोकांना आकर्षित करू पाहत आहेत. या सर्व मुली तोकडे कपडे घालून आपल्यावर रेप करवून घेण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत”. या महिलेच्या या वक्तव्यानंतर मात्र या मुलींनी या महिलेला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली.

मुलींनी तिच्या या वक्तव्याबाबत माफी मागायला लावली. पण ही महिला काही केल्या आपण काही चुकीचे बोललो आहोत हे मान्यच करायला तयार नव्हती. त्यानंतर मात्र आणि एका महिलेने अत्याचार करणाऱ्याची मानसिकता वाईट असते असे सांगून समजावण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय या जागी जर तुझी मुलगी असती तर तू असेच विधान केले असते का ? असे त्या बाईंना विचारण्यात आले तेव्हा मात्र या बाईंनी नाही असे उत्तर दिले. या सगळ्याचा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.