10 हजार रुपयांची लाच घेताना महिला टेक्निशियन अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – घरगुती मीटर व्यावसायिक न करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्विकारताना महावितरण कंपनीच्या महिला टेक्निशियनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शोभना दिलीप कहाणे (वय-56 रा. पवन नगर, ममुराबाद रोड, जळगाव) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या महिला टेक्निशियनचे नाव आहे. त्यांनी घरगुती मिटर व्यावसायिक न करण्यासाठी दोन वेळा पंधरा हजारांची लाच घेतली होती. तिसऱ्यावेळेस लाच घेताना ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई आज (सोमवार) दुपारी साडेतीन वाजता दिक्षितवाडीतील महावितरणच्या कार्यालयात करण्यात आली.

जळगाव शहरातील तक्रारदार यांच्याकडे चार भाडेकरु असून त्याचे एकच मीटर आहे. भाडेकरु असल्याने घरगुती मिटर व्यावसायिक करावे लागेल तसेच दंड आकारला जाईल असे सांगून महावितरणच्या सीनियर टेक्निशियन शोभना कहाणे यांनी कारवाई न करण्यासाठी पहिल्यांदा 10 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांनी त्यांच्या मागणीनुसार दहा हजार रुपये दिले. त्यानंतर कहाणे यांनी पुन्हा पाच हजार रुपये मागितले. त्रास होऊ नये म्हणून तक्रारदार यांनी पाच हजार दिले. मात्र, पैशाचा मोह कहाणे यांना आवरता आला नाही. त्यांनी तक्रारदार यांच्याकडे पुन्हा दहा हजार रुपये लाच मागितली. यावेळी तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जीएम ठाकूर यांच्याकडे तक्रार केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची पडताळणी करुन आज दुपारी दीक्षितवाडी कार्यालयात सापळा लावला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची दहा हजार रुपयांची रक्कम स्विकारताच शोभना कहाणे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.