तुर्तास अंतिम वर्षाची परीक्षा अशक्य, CM उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आला. कोरोनाचं संकट माहाराष्ट्रावर असल्याने तूर्तास राज्यात परीक्षा न घेण्याच्या निर्णयांवर राज्य सरकार ठाम आहे अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. परीक्षा घेऊ नये ही भूमिका आपत्ती व्यवस्थापन समितीने कायम ठेवली. आजची कोविडची परिस्थिती पाहता परीक्षा घेणं शक्य नाही. अनेक महाविद्यालयात क्वारन्टाइन सेंटर करण्यात आले आहेत. मागच्या परिस्थिती पेक्षा आताची परिस्थिती गंभीर आहे, असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं आहे.

दुपारी एक वाजता राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. यावेळी विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत चर्चा झाली. त्यामध्ये ठाकरे सरकार परीक्षा न घेण्याच निर्णयांवर ठाम असल्याचा निर्णय झाला. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्ष घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. गुणवत्ता व भविष्यातील संधीसाठी विद्यार्थ्याचे शैक्षणिक मूल्यांकन महत्त्वाचे असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

काय म्हणले उदय सामंत ?

– एटीकेटी बाबत सर्व कुलगुरुंनी सकारात्मक निर्णय घेतला

– बंगळुरूमध्ये 50 जणांची परीक्षा घेतली यात निम्म्या विद्यार्थ्याना कोरोनाची बाधा झाली

– मग हजारो विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार

– वाईन शॉप आणि विद्यार्थी यांची तुलना करू नका

– पालक आणि विद्यार्थी या सर्वांनी या परीक्षेला विरोध केला.

– सरकारला कुठला इगो नाही

– 12 हजार कंटेन्मेंट झोन, यामध्ये 1 कोटी लोक आहेत. मग येथील विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेणार ?

– विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका

दरम्यान, युजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, महाराष्ट्रासह पंजाब, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि दिल्ली यांनीही जाहीरपणे आपला विरोध दर्शवला आहे.