अर्थमंत्री सीतारमन यांचे पतीच म्हणतात, देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशामध्ये मंदीचे सावट असून देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती देखील नाजूक असल्याने सरकारवर विरोधी पक्षांकडून सतत टीका केली जात आहे. मात्र, आता देशाच्या अर्थमंत्री असलेल्या निर्मला सितारमन यांचे पती पराकला प्रभाकर यांनी देखील देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जोरदार चर्चा सुरु झाली आहे. एका हिंदी वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीमध्ये प्रभाकर यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी वक्तव्य केले.
सरकारकडे ठोस रणनीती नाही

देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त करताना प्रभाकर यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट असल्याचे म्हटले आहे. तसेच ही परिस्थीती सुधारण्यासाठी सरकारने योग्य ती पावलं उचलायला हवीत असा सल्ला देताना त्यांनी या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारकडे कोणतीही ठोस रणनीती दिसत नसल्याची खंत व्यक्त केली. प्रभाकर हे हैदराबाद येथील राईट फोलिया या खासगी कंपनीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.

अनेक क्षेत्रांवर परिणाम
मुलाखतीमध्ये प्रभाकर यांनी पुढे सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती खराब आहे. सरकार जरी मान्य करत नसले तरी जी आकडेवारी समोर येत आहे, त्यावरून हे दिसून येते की अनेक क्षेत्रांवर मंदीचा परिणाम होत आहे. या चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीतील जीडीपी दर सहा वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर 5 टक्क्यावर पोहचला आहे. तर बेरोजगारीच्या दराने 45 वर्षातील उच्चांक गाठला असल्याचे त्यांनी लिहलेल्या लेखात म्हटले आहे.

म्हणूनच लोकसभेच्या निवडणूकीत अर्थव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला नाही
देशाला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारके कुठलीही ठोस रणनीती दिसत नाही. पक्ष नेतृत्वास कदाचित याची कल्पना होती. म्हणूनच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने अर्थव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला नाही. केवळ राजकीय, राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यांनाच समोर केले गेले असे देखील प्रभाकर यांनी म्हटले आहे.

Visit : Policenama.com