1 एप्रिलपासून इन्कम टॅक्स, GST सह PAN चे नियम बदलणार, तुमच्या खिशावर थेट परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – एक एप्रिलपासून नवीन फायनान्शियल ईयर सुरू होत आहे. नव्या आर्थिक वर्षात काही नियमांमध्ये बदल होत आहेत जे तुमच्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहेत. हे बदल जीएसटी रिटर्नपासून पॅनकार्डच्या नियमात होणार आहेत. एक एप्रिलपासून नेमके कोणते बदल होणार आहेत, ते जाणून घेवूयात.

पॅन आणि आधार कार्ड :
1 एप्रिलपासून तुमचे पॅनकार्ड इनवॅलिड होईल, जर तुम्ही ते आधारशी लिंक केले नसेल. पॅन आणि आधार नंबर लिंक करण्याची शेवटची तारीख, 31 मार्च, 2020 आहे. मागच्या वर्षी पॅन-आधार लिंकिंगची डेडलाइन अनेकदा वाढवण्यात आली होती. सुमारे 17.58 करोड पॅन अजूनही आधारशी लिंक नाहीत, तर 30.75 करोडपेक्षा जास्त लोकांनी आपले पॅन आधारशी लिंक केलेले नाहीत.

नवीन इन्कम टॅक्स सिस्टम होणार लागू :
बजेट 2020-21 मध्ये सरकारने पर्यायी दर आणि स्लॅबसह नवी आयकर व्यवस्था सुरू केली, जी 1 एप्रिलपासून सुरू होणार्‍या आर्थिक वर्षात लागू होत आहे. नव्या कर व्यवस्थेत कोणत्याही कपातीचा आणि सवलतीचा लाभ मिळणार नाही. परंतु नवी कर व्यवस्था पर्यायी आहे, म्हणजे करदाता जुनी कर व्यवस्था निवडूण जुन्या टॅक्स स्लॅबपद्धतीने कर भरू शकतो.

तर नव्या कर प्रस्तावानुसार 5 लाख वार्षिक उत्पन्न असणार्‍यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. 5 ते 7.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणार्‍यांसाठी टॅक्सचे दर 10%, 7.5 ते 10 लाख रुपये उत्पन्नावर 15%, 10 लाख रुपये ते 12.5 लाख रुपये उत्पन्नावर 20%, 12.5 लाख रुपये ते 15 लाख रुपये उत्पन्नावर 25% आणि 15 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% दराने कर लावला जाईल.

नवीन जीएसटी रिटर्न :
जीएसटी कौन्सिलच्या 31च्या बैठकीत टॅक्सपेयर्ससाठी नवीन जीएसटी रिटर्न सिस्टम सादर करण्यात आली होती. ही नवी सिस्टम एक एप्रिलपासून लागू होत आहे. यामुळे जीएसटी रिटर्न भरणे सोपे होणार आहे. नव्या व्यवस्थेअंतर्गत दोन नवीन फॉर्म आणले आहेत. ते फॉर्म 1 आणि फॉर्म 2 असे आहेत.

परदेशी टूर पॅकेजसाठी टीसीएस :
1 एप्रिल 2020 पासून परदेशी टूर पॅकेज खरेदी आणि परदेशात पैसे खर्च करणे महागणार आहे. जर कुणी परदेशी टूर पॅकेज खरेदी करत असेल किंवा परदेशी चलन एक्सचेंज करत असेल तर 7 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कमेवर टॅक्स कलेक्शन अ‍ॅट सोर्स द्वारे कर लागेल. केंद्र सरकारने बजेट 2020 मध्ये सेक्शन 206 सी मध्ये दुरूस्ती करून परदेश टूर पॅकेज आणि निधीवर 5 टक्के टीसीएस लावण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहनांचा नियम :
एक एप्रिलपासून देशात केवळ बीएस -6 दर्जाची वाहने विकली जातील. सुप्रीम कोर्टाने ऑक्टोबर 2018 मध्ये हा आदेश दिला होता. 31 मार्च 2020 नंतर बीएस -4 दर्जाची नवी वाहने विकली जाणार नाहीत. बीएस-4 वाहने विकण्यासाठी ऑटोमोबाइल कंपन्यांनी अने ऑफर्स दिल्या आहेत आणि आपले बीएस-4 गाड्यांचे मॉडेल खरेदी करण्यावर मोठी सूट दिली जात आहेत.

जनावरांच्या औषधांसंबंधी नियम :
सरकारने सर्व मेडिकल डिवाइसला ड्रग्स म्हणजे औषध घोषित केले आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी एक अधिसूचना जारी केली आहे. ज्यानुसार माणूस आणि जनावरांसाठी वापरण्यात येणारी उपकरणेसुद्धा ड्रग्ज म्हटली जातील. यानंतर आता ड्रग्ज अ‍ॅण्ड कॉस्मेटिक अ‍ॅक्ट 1940 (23 /1940) चे कलम 3 अंतर्गत माणूस आणि जनावरांसाठी वापरण्यात येणारी उपकरणे औषधाच्या श्रेणीत येतील. हा कायदा 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.