पुणे जिल्ह्यात 5 महिन्यांत मास्क न घालणाऱ्यांकडून तब्बल 18 कोटी 64 लाखांचा दंड वसूल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या 5 महिन्यात पुणे जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्या व रस्त्यावर थुंकणाऱ्या 5 लाखांहून अधिक लोकांवर कारवाई करून तब्बल 18 कोटी 64 लाख 90 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 9 कोटी 83 लाखांचा दंड पुणे शहरातून वसूल केला आहे. त्यानंतर ग्रामीण भागात 2 लाख 32 हजार 350 लोकांवर कारवाई करत 5 कोटी 20 लाखांचा व पिंपरी चिंचवड शहरातून 90 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर जिल्ह्यात लोकांना मास्क वापरण्याची सवय लागावी म्हणून प्रशासनाने सप्टेंबर महिन्यापासून रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणा-या व रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली. यात गेल्या पाच महिन्यांत एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल 5 लाखांहून अधिक लोकांवर कारवाई करत 18 कोटी 64 लाख 90 हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. सध्या लोकांनी मास्क घालावा याबाबत जनजागृती करत दंड वसुली करण्याऐवजी मास्क न घालणारी व्यक्ती दिसल्यास कसा भेटला बकरा या अविर्भावात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पोलीस, प्रशासनाला सापडलेला ‘महसुल ‘ गोळा करण्याचा नवा फंडा सापडला आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यांत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडाला. त्यानंतर गेल्या दहा महिन्यांत ही संख्या 3 लाख 61 हजारांवर जाऊन पोहचली. यात तब्बल 8 हजार 785 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आज जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 837 ऐवढी आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात कोरोनाची रूग्ण संख्या प्रचंड वेगाने वाढत असताना नागरिक मात्र फारसे गंभीर नव्हते. कोरोना हा उद्रेक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या. याच कारवाईचा एक भाग म्हणून मास्क न घालणारे व रस्ता, सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता.