रोइंगपटू दत्तू भोकनळ विरोधात गुन्हा दाखल ; लग्नास नकार देऊन छळ केल्यामुळे महिलेची तक्रार

मुंबई : वृत्तसंस्था – २०१६ ला झालेल्या रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेला महाराष्ट्राचा पहिला रोइंगपटू दत्तू भोकनळच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील आडगाव पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

महिलेच्या पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, २०१५ ला आर्मीमध्ये असताना दत्तू भोकनळला आर्मी मेडल मिळाल्यानंतर चांदवडमध्ये त्याचा सत्कार ठेवण्यात आला होता. तेव्हा त्याची आणि माझी ओळख झाली. काही दिवसांनी मैत्रीच रूपांतर प्रेमात होऊन आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही २०१७ ला आळंदी येथे जाऊन हिंदू पद्धतीने विवाह केला होता. यानंतर या विषयी कुठेही न सांगता आम्ही नातेवाइकांसमक्ष लग्न करण्याचे ठरवले.

दोन वेळा लग्नाची तारीख ठरली असताना दत्तूने ऐनवेळी लग्नाला नकार दिला. त्याने मला २२ डिसेंबर २०१७ ते ३ मार्च २०१९ पर्यंत शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. लग्नाबाबत विचारल्यास विष पिऊन आत्महत्या करेन अशी धमकीही दत्तूने मला दिली’.

या घटनेमुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून दत्तू आणि त्याच्या वकीलाने मीडियाशी बोलण्यास नकार दिला आहे. आम्ही आमची बाजू न्यायालयात मांडू असे त्यांनी सांगितले.

दत्तू भोकनळ कोण आहे ?

दत्तू भोकनळ हा रिओ ऑलिंपिक मध्ये सहभागी होणार महाराष्ट्राचा पहिला रोइंगपटू आहे.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात तळेगाव रोही हे त्याचे गाव आहे.
२०१५ साली बीजिंग येथे झालेल्या आशियन रोइंग चॅम्पियीनशिपमध्ये त्याने सिल्वर मेडल मिळवले होते.
तो लष्कराचा जवान असून सैन्यात भरती झाल्यावर त्याने रोइंगला सुरवात केली.