११ वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना ; ‘त्या’ ६ जणांचे वाचले प्राण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – घरातील ‘फ्रीजच्या कॉम्प्रेसर मधून गॅस गळती झाल्यामुळे आग लागली. मात्र पाणी पिण्यासाठी मध्यरात्री उठलेल्या आकरा वर्षाच्या नातवाने प्रसंगावधान दाखवल्याने आजोबासह कुटुंबातील सहा जणांचे प्राण वाचले. हा प्रकार रविवारी पहाटे पावणे दोनच्या सुमारास कासारवाडी येथे घडला.

अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथील सागर हाइट्स या इमारतीमध्ये कदम कुटुंब राहते. सध्या मुलांना शाळेच्या सुट्ट्या असल्याने कदम यांची मुलगी, जावई आणि नातू घरी आले आहेत. शनिवारी रात्री उशीरा घरातील सर्वजण झोपेत होते. त्यावेळी नातू ‘मॅक्स पॉल चाबुकस्वार’ हा पाणी पिण्यासाठी उठला. किचन मध्ये असणाऱ्या फ्रीजचा दरवाजा उघडताच स्फोट झाला. त्याने लगेच तेथून पळ काढला. घरातील सर्वांना झोपेतून जागे करून घरातून बाहेर पळ काढला आणि आगीची माहिती अग्निशामक दलास दिली.

संत तुकारामनगर, भोसरी येथील अग्निशमन केंद्राचे बंब आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. अर्धातासाच्या प्रयत्ननंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तो प्रयत्न घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.