विमानवाहू युद्धनौका INS विक्रमादित्यला भीषण आग ; लेफ्टनंट कमांडरचा मृत्यू

कारवार : वृत्तसंस्था – विमानवाहू युद्धनौका INS विक्रमादित्यला आग लागण्याची घटना घडली आहे. या आगीत एका लेफ्टनंट कमांडरचा मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आगीनंतर नौदलानं त्वरीत चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कारवार येथील नौसेना बेसवर जात असताना INS विक्रमादित्यला आग लागली. यामध्ये लेफ्टनंट कमांडर डी.एस. चौहान यांचा मृत्यू झाला आहे. आगीत लेफ्टनंट कमांडर डी.एस. चौहान गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं आहे.

जानेवारी २०१४ रोजी ही युद्धनौका भारताने रशियाकडून घेतली आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय नौदलात समाविष्ट झालेली ही तिसरी विमानवाहू नौका आहे.

आयएनएस विक्रमादित्य ही मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदल कमांडची नौका असून या नौकेवरील तीन वर्षातील हा दुसरा अपघात आहे. यापूर्वी १६ जून २०१० मध्ये वायुगळतीच्या दुर्घटनेत राकेश कुमार आणि मोहनदास कोळंबकर या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

आयएनएस विक्रमादित्यची वैशिष्ट्ये-

विक्रमादित्यचं वजन ४४,५०० टन
उंची ६० मीटर म्हणजेच २० मजली इमारतीएवढी
लांबी- २८५ मीटर,
वेग- २९ नॉट्स म्हणजे ५४ किमीप्रती तास
या भव्य जहाजावर २३ डेक आहेत. तब्बल ४५ दिवस खोल सागरात राहण्याची तिची क्षमता आहे. तब्बल २४ मिग २९ के ही लढाऊ विमानं आणि १० हेलिकॉप्टर तिच्या ताफ्यात आहेत. तसेच कामोव्ह-३१ आणि कामोव्ह-२८ पाणबुडीविरोधी यंत्रणा यांनी ही नौका सुसज्ज आहे.