अहमदनगर : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युवकावर गोळीबार, प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जुन्या वादातून पूर्वीच्या जोडीदार असलेल्या दोघांनी युवकावर गोळ्या झाडल्या. सुदैवाने त्याच्या हाताला गोळी लागल्याने तो बचावला आहे. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. जखमीवर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सचिन गोरख कुऱ्हाडे (वय २५, रा. घोडेगाव, ता. नेवासा) हे जखमी युवकाचे नाव आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, आज सायंकाळी सचिन कुऱ्हाडे हे घोडेगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ उभे होते. त्यावेळी मोटारसायकलवरून दोन जण आले. त्यातील पाठीमागील बाजूस बसलेल्याने कुऱ्हाडे यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी हाताच्या दंडाला लागली, तर दुसरी गोळी हुकली. गोळीबाराच्या आवाजाने चांगलाच गोंधळ उडाला व ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीजवळ धाव घेतली. ग्रामस्थ आपल्याकडे येत असल्याचे पाहून दुचाकीवरून दोघेही पसार झाले.

हाताच्या दंडाला गोळी लागल्यामुळे कुऱ्हाडे हे सुदैवाने बचावले. हल्लेखोर हे त्याच्या ओळखीचे असून त्यांच्यात यापूर्वी वाद झाले होते. त्या वादातूनच हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांना हल्लेखोरांची माहिती मिळाली आहे. सोनई पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर घोडेगाव परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस उप अधीक्षक मंदार जवळे यांच्यासह पोलिस फौजफाटा तातडीने गावात दाखल झाला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –