पुण्यात छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दोन मित्रांमध्ये पूर्वी झालेल्या वादातून एकाने छऱ्याच्या बंदुकीतून गोळी झाडल्याने त्याचा मित्र जखमी झाला. ही घटना नांदेड फाटा येथील दळवीनगरमध्ये बुधवारी रात्री पावणे अकरा वाजता घडली.

रोनित देवीदास राठोड (वय २५, रा. दळवीनगर, नांदेडफाटा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी भरत वाघ (वय २७, रा. दळवीनगर, नांदेडफाटा) याला अटक केली असून भय्या प्रसाद शेलार (वय १८) याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, रोनित राठोड आणि भरत वाघ हे दोघे मित्र असून ते शेजारी शेजारी राहतात. त्यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. हा राग भरत याच्या मनात होता. बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास भरत रोनित याच्याकडे गेला. त्यावेळी त्याच्या बरोबर भैय्याही होता. त्यावेळी रागाच्या भरात भरत याने आपल्याकडील छऱ्याच्या बंदुकीतून रोनितवर दोन गोळ्या झाडल्या. त्या रोनितच्या पोटात शिरल्या. ही घटना पाहिल्यानंतर रोनित याच्या पत्नीने तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेल्या व पोलिसांना याची माहिती दिली. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्याेधन पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बंदुक जप्त करुन दोघांनाही ताब्यात घेतले.

You might also like