5 दिवसांचा आठवडा : ठाकरे सरकारमधील ‘हे’ 2 मंत्री ‘आमने-सामने’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून सरकारमधीलच मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे. कृषी मंत्री बच्चू कडू यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तर गुलाबराव पाटील यांनी आर्थिक काटकसरीचा हवाला देत राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

कर्मचारी संघटनांकडून सातत होणाऱ्या मागणीची दखल घेत राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यानंतर मात्र सरकारमधीलच मंत्र्यांनी याला विरोध केला आहे तर काही मंत्र्यांनी याचे स्वागत केले आहे. सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर मंत्रीमंडळातीलच मंत्री आमने सामने आले आहे.

सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सतत आवाज उठवणारे बच्चू कडू यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पाच दिवसांऐवजी दोन दिवसांचाच आठवडा करावा आणि उरलेले दिवस सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यावी, असे माझे मत असल्याचे बच्चू कडू यांनी व्यक्त केले. तसेच कर्मचारी पाच दिवसांचे काम दोन दिवसात करणार असतील तर काहीच अडचण नसल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच पाच दिवसांचा आठवडा लागू होऊ शकतो, तर मग पगारही कामावर आधारितच द्यायला हवा, अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेचे उपनेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. पाच दिवसांच्या आठवड्यामुळे मंत्रालय एक दिवस बंद राहील. त्यामुळे विविध सुविधांवर होणारा एक दिवसांचा खर्च बंद राहील, त्यामुळे खर्च वाचेल, असे त्यांनी म्हटले आहे. कार्मचाऱ्यांच्या कामावर आधारीत पगार देण्याच्या बच्चू कडू यांच्या मागणीवर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, कामावर आधारित पगार देण्यासाठी कुठला थर्मामीटर लावायचा ? किती डिग्री काम केले हे मोजता येईल काय, अशी विचारणा त्यांनी केली आहे.