पुण्यातील पुर परिस्थीती कायम, शहरातील ७ पुल पाण्याखाली ; पोलिसांनी दिल्या महत्वाच्या सूचना, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे आणि परिसरामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे धरणांमधून हजारो क्युसेक्सने पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुळा-मुठा नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे नद्यांवर असलेले पुल पाण्याखाली गेले असून शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे पुण्यातील जलजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील सात पुल पाण्याखाली गेल्याने याठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, पाण्याचा प्रवाह काहीसा कमी झाल्याने महादजी शिंदे पुल (डिमार्ट औंध ते सांगवी मार्गावरील) वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याची माहिती वाहतुक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली.

मुळशी आणि पवना धरणांमधून मोठ्या प्रमाणात विर्सग सोडण्यात आल्याने मुठा नदीच्या पाण्याचा पातळीत वाढ झाली. यामुळे औंध, सांगवी, येरवडा, दापोडी, वडगावशेरी, विश्रांतवाडी या भागात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. मुळा नदीला आलेल्या पूरामुळे सोमवारी (दि.५) रोजी सकाळी महादजी शिंदे पुल (डीमार्ट औंध ते सांगवी मार्गावरील), राजीव गांधीपुल (औंधगाव ते डांगे चौक मार्गावरील), जुना सांगवी पुल (स्पायसर कॉलेज ते जुनी सांगवी, नवी सांगवी मार्गावरील), दापोडी पुल (भाऊ पाटील रोड ते दापोडीगाव मार्गावरील), जुना होळकर पुल (खडकीबाजार ते साप्रस मार्गावरील ) हे पाच पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.

तर मुठा नदीला आलेल्या पूरामुळे डेक्कन येथील भिडे पुल आणि महापालिका भवन समोरील टिळक पुल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. या बरोबरच औंध, सांगवी, वडगावशेरी, येरवडा नदी पात्र, शांतीनगर, विश्रांतवाडी, सिंहगडरोड, पुण्यातील नदी पात्र रस्ता येथील रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांनी वाहतुकीची सद्याची परिस्थिती punetrafwatch.com या वेबपेजवर जाणून घेता येईल असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त