अहमदनगर : मुळा नदीला पूर, धरणात पाण्याची मोठी ‘आवक’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पारनेर तालुक्यातील मांडवे येथील मुळा नदीला मोठा पूर आला आहे. सततच्या पावसामुळे संपूर्ण मुळा नदी पात्र भरून वाहत आहे. मांडवे येथील मुळा नदी वरून जाणारा पूल संपूर्ण पाण्याखाली गेला आहे. मात्र प्रशासनाने याबाबत कोणतीही सतर्कता बाळगलेली दिसत नाही.

मांडवाचे उपसरपंच राहुल जाधव यांनी प्रशासनाची संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रशासनाचा एकही अधिकारी नसल्याचे आणि सर्व जण आपापली हद्द सोडून बाहेरगावी गेल्याचे उत्तर त्यांना फोन द्वारे देण्यात आले. त्यामुळे एखादी मोठी अनुचित घटना घडली, तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्यावरून ग्रामस्थांची मोठी वर्दळ असते. चुकूनही एखादा गावकरी वाहत्या पाण्यातून पुलावरून गेल्यास वाहून जाण्याची शक्यता आहे. तसेच हे पाणी वाढत राहिले, तर संपूर्ण मांडवे गावही पाण्याखाली येऊ शकते. मात्र प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी कोणतीही खबरदारी घेतली नसल्याने मांडवे गावातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

धरणात पाण्याची आवक

मुळा धरणात तेरा वर्षानंतर प्रथमच सर्वात मोठी आवक सुरू झाली आहे. आज दुपारी बारा वाजता लहीत खुर्द (कोतुळ) येथे मुळा नदीपात्रातून ५२ हजार क्युसेसने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. धरण साठा १६ हजार ८२० दशलक्ष घनफूट (६४.६९ टक्के) झाला आहे. मुळा नदीवर जेथे पाणी मोजले जाते. त्या लहित खुर्द (कोतुळ ) येथील पूल पाण्याखाली गेला आहे. पुलावर ७५ सेंटीमीटर पाणी आहे. यापूर्वी २००६ साली ५२ हजार क्युसेकने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू होती. लहित खुर्द ते मुळा धरण दरम्यान सुमारे ७० किलोमीटर अंतरात मुळा नदीला मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठाच्या शेत जमिनीत पाणी शिरले आहे. नदी काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त