नितिन गडकरींचे खाते नेमके कोणासाठी करतेय काम ? ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट्स वेल्फेअर असोशिएशनचा ‘सवाल’

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय नेमके कोणासाठी काम करीत आहे. लॉकडाऊन केल्यानंतर टोल वसुली स्थगित केली व आता काही भागात उद्योग, व्यवसायाला परवानगी दिल्यानंतर तातडीने ही टोल वसुली सुरु करण्याचा उद्योग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला असून सोमवारपासून देशभरातील टोलनाक्यावर टोल वसुली सुरु झाली आहे. त्यामुळे गडकरी यांचे हे खाते नेमके जनतेसाठी काम करते की टोल वसुल करणार्‍या कंपन्यांसाठी असा प्रश्न माल वाहतूकदारांच्या ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट्स वेल्फेअर असोसिएशनने विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन झाली केला. त्यामुळे देशातील सर्व प्रकारची वाहतूक बंद झाली होती. महामार्गावर चिटपाखरु दिसत नव्हते. त्यामुळे टोल असला काय अथवा नसला काय?.  रस्त्यावर वाहनेच नसल्याने टोल भरणारे कोणीही नव्हते. अशावेळी काहीही कारण नसताना टोल वसुली होत नसताना व काही अडचण नसताना जाणीवपूर्व टोल वसुलीला स्थगिती देण्यात आली. आता २० एप्रिलपासून रेड झोन वगळता अन्य ठिकाणी काही उद्योग सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. अत्यावश्यक वस्तूंच्या मालवाहतूकीला परवानगी देण्यात आली. देशभरात जागोजागी गेली २५ दिवस अडकून पडलेले ट्रक आता रस्त्यावर येणार असे दिसून येताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल वसुली सुरु करण्याचा आदेश काढला.

टोल वसुली सरुु करण्याचा आदेश काढल्याने मालवाहतूकदार नाराज झाले आहेत. आधीच गेले २५ दिवस ट्रक अडकून पडले असून त्यांच्याकडील पैसे संपलेले आहेत. अशावेळी टोल भरायला त्यांच्याकडे कोठून पैसे असणार. टोल वसुली सुरु केल्याने अत्यावश्यक सेवेतील वाहनांना नाक्यांवर अडकून पडून माल पुरविण्यास उशीर होणार आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांचे खाते नेमके जनतेसाठी आहे की, टोल वसुल करणार्‍या कंपनीचे असा प्रश्न विचारला जात आहे.

लॉकडाऊनचा शेतकर्‍यांना मोठा फटका बसला. शेतात पिकलेला माल बाजारात पोहचू शकत नाही. जो बाजारात जाण्याची शक्यता आहे. त्यावर आता टोल भरावा लागणार आहे.  यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली होती. त्यावेळी पैशांची चणचण असल्याने काही दिवस टोल बंदी केली होती. या काळात दररोज किती वाहने धावतात, याची सरासरी काढून सरकारने टोल वसुली करणार्‍या कंपन्यांना कोट्यवधींची नुकसान भरपाई दिली होती. आताही रस्त्यावर वाहनेच नसताना टोल वसुलीला स्थगिती दिली. त्यामागे अशाच प्रकारे नुकसान भरपाई वसुल करण्याचा या कंपन्यांचा डाव असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या खात्यावर टिका होत असताना अजूनपर्यंत तरी नितीन गडकरी यांनी कोणतेही भाष्य यावर केलेले नाही. संपूर्ण देशभर सोमवारी सकाळपासूनच टोल वसुली सुरु करण्यात आली आहे़ त्यात अनेक ठिकाणी काही लेनच सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहे. वाशी येथील मार्केट आजपासून सुरु झाल्याने तेथे राज्यातील अनेक ठिकाणाहून शेतमाल घेऊन ट्रक आले आहेत. तसेच अन्य वाहनांची गर्दी आहे़ त्यामुळे वाशी टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.