भाजपचा मोर्चा महाराष्ट्राकडे ? देवेंद्र फडणवीस दिल्लीत उद्या घेणार PM नरेंद्र मोदींची भेट

नवी दिल्ली 17 जुलै: महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी आज गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर शनिवारी फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

महाराष्ट्र आणि दिल्लीमध्येही कोरोनाचा फैलाव अधिक झाला आहे. असे असतांना फडणवीसांनी दोन दिवसांचा दिल्ली दौरा करत असल्याने याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पक्षाचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे देखील ही दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. आज फडणवीस यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातली कोरोनाची स्थिती आणि राजकीय विषयांवरही चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मध्यप्रदेश राज्यातील सत्ता खेचल्यानंतर भाजपने राजस्थानकडे आपला मोर्चा वळविला होता. त्यानंतर आता त्यांनी महाराष्ट्राकडे अधिक लक्ष देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे ‘मिशन महाराष्ट्राच्या’ कामगिरीसाठी फडणवीस दिल्लीमध्ये आहेत, अशी चर्चा होत आहे. महाराष्ट्र राज्यातील सत्ता थोडक्यात गेल्याने भाजपला आता गप्प बसवेना अशी स्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा परत येण्यासाठी भाजपने मोर्चे बांधणी सुरु केली आहे, असे संकेत राजकीय वर्तुळातून समजत आहेत.

ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट या दोन नेत्यांच्या बंडानंतर काँग्रेसला हादरे बसलेत. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यातील अनेक नेते असंतुष्ट आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तेची बांधणी सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करून काही दिवसांसाठी भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता मिळविली होती. मात्र, न्यायालयाने निर्णयापुढे हे सर्व टिकू शकले नाही.

त्याप्रकारची घटना पुन्हा घडू नये, म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रयत्नशील आहेत. मात्र, सत्तेतल्या तिनही पक्षामध्ये सर्वच काही आलबेल नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. नुकतेच ‘महाजॉब्स’च्या जाहिरातीमध्ये काँग्रेसच्या नेत्याला स्थान न दिल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावेळी शिवसेनेने आपली चूक मान्य करत तात्काळ दिलगिरी व्यक्त केली होती. त्यामुळे याचा फायदा घेऊन भाजप आता आपली खेळी खेळणार तर नाही ना? असा शंका वजा प्रश्न उपस्थित होत आहे.