माजी महापौर कमलताई व्यवहारेंची माघार, काँग्रेसचे अरविंद शिंदे यांना पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कसबा मतदार संघातून माजी महापौर कमल व्यवहारे यांनी माघार घेत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी अद्यापही त्यांचा अर्ज ठेवल्याने भाजप – शिवसेनेच्या उमेदवार मुक्ता टिळक यांची डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारी अर्ज माघारीसाठी अद्याप दीड तास बाकी असून तीन वाजल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

कमल व्यवहारे यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पाच वेळा नगरसेवक, महापौर आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला आघडी प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या व्यवहारे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार अरविंद शिंदे यांच्या विरोधात बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता. दरम्यान, उमेदवरीतील प्रतिस्पर्धी रविंद्र धंगेकर यांची मनधरणी करून त्यांना आपल्याकडे वळविण्यात काँग्रेसचे नेते यशस्वी ठरले होते. मात्र व्यवहारे यांचा अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत राहिल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. परंतु आज पक्षाच्या वरिष्ठांनी चर्चा केल्यानंतर आज व्यवहारे यांनी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या गटात उत्साह संचारला आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. शिवसेनेकडून त्यांच्या मनधरणी चे प्रयत्न सूरु आहेत. मात्र, त्यांनी माघार न घेतल्यास याचा भाजपच्या उमेदवार मुक्ता टिळक यांना त्रास होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Visit : Policenama.com